अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली ‘केरळ पर्यटन’
महादेव पाटील यांचा आरोप : तासगाव बाजार समितीच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची उधळण

तासगाव, रोखठोक न्यूज नेटवर्क
तासगाव बाजार समितीच्या संचालकांकडून शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांची उधळण सुरू आहे. अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली संचालक ‘केरळ पर्यटना’ला गेले आहेत. या दौऱ्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. या अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांना काडीचाही फायदा होत नाही, असा घणाघाती आरोप बाजार समितीचे संचालक महादेव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, बाजार समितीच्या संचालकांची अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली मौज – मज्जा सुरू आहे. या दौऱ्यासाठी पणनकडून अंदाजे दीड लाख रुपये खर्चाची मंजुरी घेतली आहे. मात्र एवढ्या पैशात यांची सहल होत नाही म्हणून व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये उकळले गेले आहेत. त्यामुळे बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार सुरू आहे.
ते म्हणाले, अभ्यास दौऱ्यासाठी वारंवार लाखो रुपये उधळले जातात. मात्र या अभ्यास दौऱ्याचा शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होतो? आजपर्यंत अशा अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांना कसलाही फायदा झाला नाही. बाजार समितीत शेतकरी हिताचे कोणतेही निर्णय होत नाही. प्रत्येकाने बाजार समितीतून पैसे मिळवण्यास सुरुवात केली आहे. शिवाय अभ्यास दौऱ्यात संचालकांशिवाय आमदार रोहित पाटील यांचे चुलते सुरेश पाटील व अन्य काही लोक गेले आहेत. हे सगळं नियमबाह्य आहे.
तालुक्यात दरवर्षी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. ती रोखण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. शेतकरी, हमाल यांच्या अनेक अडचणी आहेत. बाजार समितीत त्यांना कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. गेल्या दोन वर्षात शेतकरी हित सोडून सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचा अनावश्यक चुराडा करण्यात आला आहे. गार्डन, सभापती, उपसभापती, सचिव केबिन, सभागृहाच्या नूतनीकरणावर निधीचा अपव्यय करण्यात आला आहे.
ते म्हणाले, बाजार समितीची निवडणूक होऊन दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. त्यावेळी स्व. आर. आर. पाटील कुटुंबीयांनी सहा महिन्यात बेदाणा मार्केट सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजतागायत हे काम सुरू झालं नाही. उलट दोन वर्षात 4 कोटी 51 लाख रुपये ठेकेदाराला जादा दिले असल्याचे शासनाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे सोडून आर. आर. पाटील कुटुंबीय त्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत.
युवराज पाटील यांच्या काळात भ्रष्टाचाराचा विक्रम..!
बाजार समितीचे सभापती युवराज पाटील यांच्या काळात भ्रष्टाचाराचा विक्रम मोडला गेला आहे. बेदाणा सौद्यावेळी व्यापाऱ्यांना वेळ वाढवून देण्यासाठी 40 – 40 हजारांची पाकिटे घेतली जात आहेत. प्लॉट स्थलांतरीत करण्यासाठी लाखोंचा सौदा होत आहे, असा आरोप महादेव पाटील यांनी यावेळी केला.
रोहित पाटील आमदार झाल्यावर चांगलं होईल वाटलं पण…
रोहित पाटील आमदार झाल्यानंतर बाजार समितीत काहीतरी चांगलं होईल. भ्रष्टाचार कमी होईल, असे वाटले होते. पण विस्तारित बाजार समितीच्या बांधकामातील घोटाळ्याप्रकरणी अनेक संचालकांच्या हातात बेड्या पडतील, अशी स्थिती असताना सुरेश पाटील मात्र अभ्यास दौऱ्याला बेकायदेशीररीत्या गेले आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कारभारात सुधारणा होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे, असाही आरोप महादेव पाटील यांनी केला.



