“कार्यकर्त्यांचंच राज्य उभारणार”: संजय पाटील यांची जाहीर भूमिका
तासगावात संवाद मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी ; कार्यकर्त्यांसाठी आयुष्य समर्पित करण्याची घोषणा

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव शहरातील कार्यकर्ता संवाद मेळावा म्हणजे जणू उत्साह, विश्वास आणि ऐक्याचं दर्शनच! माजी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीने भरलेला हा मेळावा तुफान गर्दीने गजबजला होता. सभागृहाच्या आत आणि बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती पाहून वातावरणात एक वेगळाच उर्जा प्रवाह निर्माण झाला.
संजय पाटील यांनी सुरुवातीलाच मनाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. “गेल्या ३० वर्षांपासून कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय प्रवासाला आकार दिला. निस्वार्थी, निष्ठावान आणि जीवाभावाचे कार्यकर्ते हेच माझं सर्वस्व आहेत. महाराष्ट्रात असा कार्यकर्त्यांचा परिवार लाभलेला नेता विरळाच असेल, आणि त्यापैकी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले, “परमेश्वराच्या कृपेने सांगली जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या महत्वाच्या जलसिंचन योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देता आला. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, जलजीवन मिशन अशा अनेक योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता आला. हे यश माझं नाही, ते प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे.”
संजय काका पाटील यांनी पुढे ठाम भूमिका मांडली —
“लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं. आता या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. ह्या निवडणुका म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याच्या योगदानाचं आणि समर्पणाचं उत्तरदायित्व आहे. त्यामुळे इथून पुढचं माझं संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांसाठीच असेल. त्यांचं यश म्हणजेच माझं ध्येय. कार्यकर्त्यांचा विचार न करता कोणताही निर्णय मी घेणार नाही. कार्यकर्ते हाच माझा पक्ष हाच माझा धर्म.”
सभागृहात एकच घोषणा “काका पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत!” असा निनाद घुमू लागला.
यावेळी युवा नेते प्रभाकर (बाबा) पाटील यांनीही भावनिक भाषण करत सांगितले, “मी नेता म्हणून नाही, तर तुमचा सहकारी म्हणून पुढच्या काळात काम करेन. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हेच माझं ध्येय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मी नेहमी उपलब्ध राहीन.”
या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध भागांमधून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. विलास भाऊ पाटील, प्रमोद आप्पा शेंडगे, जनार्दन दादा पाटील, बळी तात्या पाटील, संभाजी आण्णा खराडे, पी.के. पाटील, सुखदेव आबा पाटील, रमेश कोळेकर, किशोर पाटील, सुनील जाधव, आर.डी. पाटील, महेश हिंगमिरे, कुमार शेटे, महादेव आण्णा सूर्यवंशी, रणजित घाडगे, अजित माने, डॉ. प्रताप नाना पाटील, शंकर नाना मोहिते आदींसह असंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यकर्ता संवाद मेळावा संपता संपत नव्हता, कारण इथून पुढे ‘काका’ म्हणजे केवळ नेता नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांच्या संघर्ष आणि त्यांचं भविष्य यासाठी झटणारा एक सहप्रवासी बनला होता.
“इथून पुढे माझं आयुष्य कार्यकर्त्यांसाठी हे वचनच माझा राजकारणाचा नवा अध्याय ठरेल,” असं म्हणत संजय काका पाटील यांनी सभागृहात एक नवचैतन्य निर्माण केलं.



