अभूतपूर्व गर्दीत तासगावात ‘चक्काजाम’
खासदार संजय पाटील यांचा ‘कर्जमुक्ती’साठी एल्गार!

तासगाव : रोखठोक प्रतिनिधी
तासगाव शहर सोमवारी सकाळी अक्षरशः ठप्प झाले. बसस्थानक चौकात खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारोंच्या संख्येने शेतकरी आपल्या ट्रॅक्टर, बैलगाड्या, शेळ्या-मेंढ्या आणि पाळीव जनावरांसह या आंदोलनात सहभागी झाले होते. शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणारे सर्व प्रमुख रस्ते शेतकऱ्यांनी व्यापल्याने तासगाव शहर ठप्प झाले होते. दुपारपर्यंत शहराच्या बाहेरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
या आंदोलनावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले की, निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणांमुळे शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे. या जगाचा पोशिंदा स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी घाम गाळतो; मात्र आज त्याच पोशिंद्याचं जगणंच अवघड झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, अनियमित पाऊस, आणि शेतीतील वाढते खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात, ही वस्तुस्थिती आहे. यावर्षी नुकसान झालं, पुढच्या वर्षी भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी पुन्हा कर्ज काढतो, पण बँकेचे, पतसंस्थांचे आणि खाजगी सावकारांचे चक्र संपत नाही. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याने शेतकरी दरवर्षी अधिकच अडचणीत सापडतो.
शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढायचं असेल तर मायबाप सरकारने तातडीने कर्जमाफी करणे हा एकमेव उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून, नव्हे तर त्यांच्या पुढे राहून लढा देण्याची भूमिका घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “शेतकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही ढळू देणार नाही,” असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक शब्दांत भाष्य केले. ते म्हणाले की, “मी स्वतः शेतकरी आहे. द्राक्ष परवडत नाही म्हणून आंब्याची बाग लावली, पण आता वाटतं द्राक्षच चांगलं होतं. शेतीतील खर्चाचा हिशोब ठेवायला बसलो की डोकं फिरतं. शेती परवडत नाही हे डोळ्यांना दिसतंय, पण पर्याय नाही. चार-पाच एकर जमिनीच्या शेतकऱ्याच्या मुलाला आता लग्नातसुद्धा पोरी मिळणं कठीण झालंय, कारण सगळ्यांना शेतीची अवस्था माहीत आहे.”
सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरू झालेलं हे चक्काजाम आंदोलन दुपारपर्यंत तासगावच्या बसस्थानक चौकात आणि प्रमुख रस्त्यांवर सुरू होतं. शहराच्या सर्व दिशांनी आलेल्या शेतकऱ्यांनी, त्यांच्या ट्रॅक्टर-बैलगाड्यांनी आणि जनावरांनी शहर व्यापलं होतं. घोषणांचा गजर, बॅनर, ढोल-ताशांच्या गजरात झालेलं हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी झाली होती.

या आंदोलनातून तासगावात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा आवाज बुलंद झाला. कर्जमुक्तीच्या मागणीसाठी उठलेला हा एल्गार तासगावासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.



