१४ ऑक्टोबरला तासगाव-कवठेमहांकाळ ठप्प!
माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार ; शासनाच्या उदासीनतेविरोधात चक्काजाम आंदोलन

तासगाव; मिलिंद पोळ
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि वाढत जाणारे कर्ज या तिहेरी संकटात सापडलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल सध्या अतिशय दयनीय झाले आहेत. शासनाकडून मदतीच्या घोषणा आणि पंचनाम्यांच्या फेऱ्या सुरू असल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचलेली नाही. बळीराजाचा विश्वास डळमळीत झाला आहे, आणि या अन्यायाविरोधात आता तो रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे.
याच पार्श्वभूमीवर माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑक्टोबर २०२५ रोजी तासगाव आणि कवठेमहांकाळ येथे भव्य चक्काजाम आंदोलन होणार आहे. “ऐका सरकार..! बळीराजाचा एल्गार – कर्जमुक्ती हा आमचा अधिकार..!” असा आक्रोश सोशल मीडियावरून व्हायरल होत असून, हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
गेल्या आठवड्यात तासगावात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात संजयकाका पाटील यांनी शासनाच्या निष्क्रीय कारभारावर सडकून टीका केली होती. त्या मेळाव्यात त्यांनी स्पष्ट संदेश दिला होता की, “जनतेच्या प्रश्नांकडे शासनाने पाठ फिरवली आहे, आता या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही.” त्या वक्तव्यानंतरच चक्काजाम आंदोलनाच्या तयारीला वेग आला.
राजकीय जाणकारांच्या मते, हे आंदोलन केवळ शेतकरीहितापुरते मर्यादित नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणांची पायाभरणी ठरू शकते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत, संजयकाका पाटील यांनी पुन्हा एकदा “जनतेच्या न्यायासाठीचा लढा” हाती घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.
अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून तातडीने मदत मिळावी, कर्जमाफीची ठोस अंमलबजावणी व्हावी, आणि पंचनामे विलंब न होता पूर्ण व्हावेत, या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी तासगाव-कवठेमहांकाळ परिसरात या दिवशी जनआक्रोशाचा उद्रेक होणार आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे,
“शेतकरी आज केवळ पावसामुळेच नाही, तर शासनाच्या दुर्लक्षामुळेही अडचणीत आला आहे. मदतीच्या नावाखाली कागदी घोडे नाचवले जात आहेत. आता या अन्यायाविरुद्ध एल्गार घालायची वेळ आली आहे. बळीराजाचा आवाज आता रस्त्यावरूनच उठणार.”
१४ ऑक्टोबर रोजी तासगाव आणि कवठेमहांकाळ हे दोन तालुके पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून शासनाच्या उदासीनतेविरुद्ध आवाज उठवणार आहेत. जर शासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास, पुढील काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
बळीराजाच्या न्यायासाठीचा हा लढा केवळ संतापाचा उद्रेक नाही, तर शासनाच्या उदासीनतेला दिलेला स्पष्ट इशारा आहे “शेतकऱ्याचा आवाज आता दाबला जाणार नाही!”



