तासगाव–कवठेमहांकाळच्या शाश्वत विकासाचा ‘वचननामा’ प्रसिद्ध
वसंत पंचमीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा जाहीरनामा जाहीर

तासगाव :रोखठोक न्यूज
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत पंचमीच्या मंगलदिनी तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा ध्यास घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत जाहीरनामा (वचननामा) आ. रोहित पाटील यांच्या हस्ते आज प्रसिद्ध करण्यात आला.
तासगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शहाजीराजे व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.
या वचननाम्यात कृषी व जलसिंचन, पाणीपुरवठा व वीज, ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला-बालविकास, युवक कल्याण तसेच समाजकल्याण व सामाजिक न्याय या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत जलसिंचन योजना, आधुनिक कृषी सुविधा, प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी, अविरत वीजपुरवठा, दर्जेदार शिक्षण-आरोग्य सेवा व युवकांसाठी कौशल्य विकास केंद्रांची उभारणी या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
यावेळी आ. रोहित पाटील म्हणाले, “हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा नसून ठोस व शाश्वत विकासाचा आराखडा आहे. सत्ता आल्यास तासगाव व कवठेमहांकाळ पंचायत समित्या शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून वगळण्याचा ठराव करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या पंचायत समित्या ठरतील.”
यावेळी सांगली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, संजय पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



