सावळजमध्ये पाटील हॉस्पिटल कडून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण
सामाजिक बांधिलकीतून माफक दरात सेवा; ग्रामीण आरोग्यसेवेला नवे बळ

सावळज : रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावळज येथे आरोग्यसेवेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत डॉ. सतीश पाटील यांच्या पाटील हॉस्पिटलतर्फे नव्या अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचे लोकार्पण उत्साहात पार पडले. ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत आणि सुरक्षित वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सावळज व परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः अपघात, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना मिरज किंवा सांगली येथे हलविताना वेळेचा मोठा अपव्यय होत होता. हीच गरज ओळखून डॉक्टर सतीश पाटील यांनी पुढाकार घेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी रुग्णवाहिका सेवेत दाखल केली.
महत्त्वाचे म्हणजे डॉ. सतीश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत ही रुग्णवाहिका सेवा अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दररचना ठरविण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत पैशाअभावी उपचारात अडथळा येऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना दिलासा मिळणार असून, सामाजिक जाणीव आणि मानवतेचा आदर्शही निर्माण झाला आहे. या कार्यात त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीमही तितक्याच समर्पित भावनेने योगदान देत आहे.
नवीन रुग्णवाहिकेमध्ये अत्यावश्यक जीवनरक्षक उपकरणे, ऑक्सिजन सुविधा, प्राथमिक उपचार साहित्य आदी सोयी उपलब्ध असून, रुग्णाला प्राथमिक उपचार देत सुरक्षितपणे पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवे बळ मिळाले असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकार्पण सोहळ्यास सावळजचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विजय धेंडे, पंचायत समिती सदस्य ऋषिकेश बिरणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, विवेक उर्फ राजू सावंत, सचिन देसाई, डॉ. संदीप तारळेकर, डॉ. प्रताप थोरात, डॉ. माणिक गंगाधरे, डॉ. अभिजित जाधव, डॉ. मनोज जाधव, जे. बी. पाटील, श्रीकांत माने, महावीर धेंडे, सागर थोरात, सिद्धनाथ जाधव, संभाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी डॉक्टर सतीश पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन करत, ही सेवा ग्रामीण भागासाठी जीवनदायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली. सावळज परिसरातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा आणि स्वागतार्ह टप्पा मानला जात आहे.



