पै.ऋषिकेश बिरणे यांच्या पुढाकाराला यश; अग्रणी नदीपात्रात पाणी, द्राक्षबागांना दिलासा
ऐन हंगामात घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे शेतकऱ्यांत समाधानाची लाट

तासगाव : रोखठोक न्यूज
ऐन द्राक्ष हंगामाच्या निर्णायक टप्प्यावर पाण्याअभावी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पंचायत समिती सदस्य ऋषिकेश बिरणे यांनी दिलेला शब्द अखेर खरा ठरला आहे. त्यांच्या पुढाकारातून सावळज येथील अग्रणी नदीपात्रात पाणी दाखल झाले असून द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. “वेळीच पाणी मिळालं, त्यामुळे बाग वाचली,” अशी प्रतिक्रिया अनेक शेतकरी देताना दिसत आहेत.

यंदा वाढत्या उष्णतेमुळे द्राक्ष बागांना पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती. हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाण्याअभावी उत्पादन धोक्यात येण्याची भीती होती. तसेच आगामी खरड छाटणीसाठीही पाण्याची नितांत आवश्यकता भासू लागली होती. ही गंभीर परिस्थिती ओळखून ऋषिकेश बिरणे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या माध्यमातून सभासद कल्याण निधीतून सुमारे दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतीसंबंधित नैसर्गिक अडचणींवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेला हा निधी योग्य वेळी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. बिरणे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले. माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली वारणाली येथे बैठक घेऊन पाणी सोडण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली.

आवश्यक निधीचा धनादेश सोसायटीमार्फत जलसंपदा विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर पाठपुराव्याला वेग आला आणि अखेर सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पातून अग्रणी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह सुरू झाला.
नदीपात्रात पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उन्हाच्या तडाख्यात करपणाऱ्या द्राक्षबागांसाठी हे पाणी म्हणजे अक्षरशः जीवनदान ठरले आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीनंतर ऋषिकेश बिरणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार केलेल्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, वेळेवर घेतलेला पुढाकार किती महत्त्वाचा ठरतो याचे हे उदाहरण मानले जात आहे.



