सावळजमध्ये महसूल शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद; एका छताखाली सेवा, नागरिकांना त्वरित दिलासा

तासगाव : रोखठोक प्रतिनिधी
तासगाव तालुक्यात राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान-टप्पा १’ अंतर्गत सावळज येथे आयोजित शिबिराला नागरिक व शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दैनंदिन महसूल विषयक अडचणींना तात्काळ मार्गी लावण्यासाठी हे शिबिर प्रभावी ठरले.
मार्च ते मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या अभियानाचा उद्देश महसूल सेवा अधिक पारदर्शक, सुलभ व लोकाभिमुख करणे हा असून ‘सेवा तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात प्रशासन यशस्वी ठरत आहे.
१० एप्रिल रोजी सावळज ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पार पडलेल्या या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी सतीश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रभारी तहसीलदार प्रकाश बुरुंगले, नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एका छताखाली महसूल सेवा – बुरुंगले
प्रभारी तहसीलदार प्रकाश बुरुंगले म्हणाले, “नागरिकांना विविध कार्यालयांची पायपीट न करता सर्व महसूल सेवा एकाच ठिकाणी मिळाव्यात, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.” सावळजमधील प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विविध विभागांतून मोठ्या प्रमाणावर कामकाज पूर्ण
या शिबिरात महसूल विभागाकडून रहिवासी दाखले १७५, जात प्रमाणपत्रे ७८, उत्पन्न दाखले १९४, नॉन-क्रीमीलेअर १० वितरित करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेतील ३१ प्रकरणे, शेत पानंद रस्ते ७, कुणबी दाखले ४० तसेच घरकुल पट्टा वाटपासह विविध कामे पूर्ण करण्यात आली.
पुरवठा विभागाने ९ ऑनलाइन रेशन कार्ड वितरित केली व १३ दुबार नावे वगळली. भूमिअभिलेख विभागाने ७२ फेरफार मंजुरी, ७ मोजणी क प्रती, ५ वारस नोंदी व ४ फाळणी नकाशे दिले. आरोग्य विभागाने १० आभा कार्ड, ९ आयुष्यमान भारत कार्ड वितरित केली. कृषी विभागाने शेतकऱ्यांना योजनांची पूर्वसंमती व मृदा आरोग्य पत्रिका देत मार्गदर्शन केले.
महसूल विभागातील प्रकरणांनाही गती
सावळज मंडळात वारस नोंदी ५६, लक्ष्मी मुक्ती योजनेतील ३१, कजाप १, कलम १५५ अंतर्गत ९ व अज्ञान पालक संदर्भातील ५ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
नियोजनबद्ध कामामुळे यशस्वी आयोजन
मंडल अधिकारी रवीकिरण वेदपाठक व ग्राम महसूल अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या समन्वयातून शिबिराचे यशस्वी आयोजन पार पडले.
या उपक्रमामुळे शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असून प्रशासन व जनतेतील दरी कमी होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



