# अंजनीत ‘कुदरत १७’ची यशोगाथा; दत्तात्रय पाटील यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष वृतान्त

अंजनीत ‘कुदरत १७’ची यशोगाथा; दत्तात्रय पाटील यांच्या प्रयोगशील शेतीचे कौतुक

आ.रोहित पाटील यांची शेतभेट, संघटित आधुनिक शेतीसाठी मदतीचे आश्वासन

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : रोखठोक न्यूज

तासगाव तालुक्यातील अंजनी येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांच्या शेतात ‘कुदरत १७’ या गव्हाच्या वाणाची यशस्वी लागवड करून एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. सावळज–अंजनी परिसरात होतकरू व उपक्रमशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रय पाटील यांनी नवनवीन प्रयोग करण्याची परंपरा कायम राखत या वाणाची लागवड यशस्वी केली आहे.

या शेताची पाहणी करण्यासाठी आ. रोहित पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शेतात उभ्या असलेल्या भरगच्च, तब्बल एक फूट लांबीच्या कणसांची पाहणी करत त्यांनी दत्तात्रय पाटील यांच्या कष्टाचे व संशोधनात्मक दृष्टीकोनाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी शेतकरी, उत्पादक आणि संबंधित तज्ञांशी सविस्तर चर्चा करत या वाणाच्या उत्पादनक्षमता, बाजारपेठ आणि भविष्यातील संधींचा आढावा घेतला.

वाराणसीच्या पेटंट वाणाची ताकद

उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील संशोधक प्रकाशसिंह रघुवंशी यांच्या पेटंट असलेल्या ‘कुदरत १७’ या वाणाने देशभरात आपली छाप पाडली आहे. योग्य नियोजन आणि संतुलित खत व्यवस्थापन केल्यास एकरी २८ ते ३२ क्विंटल उत्पादन मिळण्याची क्षमता या वाणात आहे. चपाती व पोळींसाठी उत्तम दर्जा असल्याने ग्राहकांमध्येही या गव्हाला विशेष मागणी आहे.

अधिक कालावधी, पण खात्रीशीर उत्पादन

या वाणाचा कालावधी सुमारे १४० ते १५० दिवसांचा असून पाण्याची गरज तुलनेने अधिक असते. तरीही उत्पादनाची गुणवत्ता आणि बाजारातील स्थिर मागणी यामुळे अनेक शेतकरी आजही हा गहू घेत आहेत. कमी कालावधीत तयार होणारे सुधारित प्रकारही बाजारात उपलब्ध झाले आहेत.
संघटित शेतीसाठी मदतीचे आश्वासन
शेतभेटीदरम्यान आ. रोहित पाटील म्हणाले, द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून अशा आधुनिक, उत्पादनक्षम पिकांकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. संघटन वाढवून आणि एकत्रित नियोजन करून या वाणाचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी कटिबद्ध आहे.

दत्तात्रय पाटील यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे अंजनी, सावळज, अहमदपूर तसेच सांगोला परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशेची पालवी फुटली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशीलता आणि संघटित प्रयत्न यांच्या बळावर कुदरत १७ गव्हाची शेती तालुक्यात नवे कृषी पर्व घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!