# कहाणी सावळज जिल्हा परिषद गटाची भाग : ३ – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयविशेष वृतान्त

कहाणी सावळज जिल्हा परिषद गटाची भाग : ३

एक राजकीय गूढ : १९७८च्या निवडणुकीतील ऐतिहासिक क्रांती

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव : मिलिंद पोळ -9890710999

१९७८ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात घेऊन आलं होतं. स्वातंत्र्यलढ्यातून पुढे आलेली यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांसारखी मंडळी आता राज्याच्या राजकारणात अनुभवाने परिपक्व झाली होती. पण हळूहळू राजकीय आकाशावर तरुण रक्ताची चाहूल लागली होती बदलाची चाहूल.

त्याच काळात सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या. जिल्ह्यात वसंतदादांचा दबदबा निर्विवाद होता. पण सावळज गटात काहीतरी हलतंय, अशी कुजबुज होती. आ.दिनकर (आबा) पाटील यांच्या मनात एक विचार आकार घेत होता “या नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. या तरुणात काहीतरी वेगळं आहे…”

अंजनीचा एक तरुण,रावसाहेब रामराव पाटील. लोक त्यांना प्रेमाने “आर.आर. पाटील” म्हणू लागले होते. अभ्यासू, तल्लख, आणि भाषणकौशल्यात अफलातून. सावळजमधील अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मनातही त्यांच्या बाजूने आशा निर्माण झाली.

काँग्रेस गटात मात्र जुन्या नेतृत्वाचा प्रभाव कायम होता. वायफळचे शिवाजीराव पाटील यांना पुन्हा जिल्हा परिषद उमेदवारी मिळाली. १९७२ च्या निवडणुकीचा पराभव अजूनही सावळजकरांच्या जिव्हारी होता, आणि नव्या चेहऱ्याची अपेक्षा अपूर्ण राहिली. त्यामुळे गटात दबक्या आवाजात बंडाची कुजबुज सुरू झाली.

आणि नेमकं तेव्हाच राज्यभर वादळ उठलं. शरद पवारांनी वसंतदादा पाटीलांचे सरकार पाडलं, काँग्रेस फुटली, आणि ‘पुलोद’ नावाच्या नव्या आघाडीचा जन्म झाला. पवार मुख्यमंत्री झाले. राज्यात अस्थिरता, आणि राजकीय खेळांची मालिका सुरू झाली. सावळजच्या छोट्या गटातल्या निवडणुकीवरही या घटनांचा परिणाम होणार हे स्पष्ट होतं.

काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही, म्हणून आर.आर. पाटील समोर एकच मार्ग उरला,बंडखोरीचा. त्यांच्यासोबत रावसाहेब पोळ, रघुनाथ केडगे आणि काही असंतुष्ट कार्यकर्ते उभे राहिले. जिल्ह्यात जनता दल पक्ष पुलोदसोबत सत्तेत होता. रघुनाथ केडगे तात्यांनी थेट मुंबई गाठली आणि मुख्यमंत्री शरद पवारांसमोर सावळजचा पेच मांडला. त्यानंतर एक गुप्त निर्णय झाला सावळज गटात जनता दलाचा उमेदवार नको. याचा अर्थ, आर.आर. पाटील यांच्यासमोर आता मोकळं मैदान.

रावसाहेब पोळ यांनी पत्रकारांना सांगून “रावसाहेब पोळ व सहकाऱ्यांचा पुलोद प्रवेश” अशी बातमी वर्तमानपत्रांत छापली. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर तीच होती त्या काळची ‘ब्रेकिंग न्यूज’. काँग्रेस शिबिरात खळबळ उडाली. सावळजमध्ये राजकारण तापलं. लोक म्हणू लागले “हे काहीतरी मोठं होणार आहे.”

१९७८ ची निवडणूक आली. काँग्रेसकडून शिवाजीराव पाटील मैदानात उतरले, आणि दुसऱ्या बाजूला आर.आर. पाटील अपक्ष म्हणून पण प्रत्यक्षात पुलोद पुरस्कृत उमेदवार. त्यांचं चिन्ह होतं “बैल.”

तो बैल फक्त निवडणुकीचं चिन्ह नव्हतं. तो सावळजच्या जनतेच्या जिद्दीचा, बंडखोरीचा आणि बदलाच्या लालसेचा प्रतीक बनला होता. संपूर्ण गट त्या बैलाच्या भोवती एकत्र आला. रात्री उशिरापर्यंत चालणारे प्रचारसभांचे आवाज, आर.आर. पाटील यांच्या जोशपूर्ण भाषणांनी भारलेली मंडळी, आणि गटात निर्माण झालेली अनोखी एकजूट हे सगळं वातावरण जणू एका क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं होतं.

शिवाजीराव पाटील यांना वसंतदादांचा आशिर्वाद, अनुभव आणि जाळं होतं; पण आर.आर. पाटील यांच्याकडे होतं लोकांचं प्रेम आणि तरुणाईचं बळ. निकाल लागला तेव्हा सावळजने इतिहास घडवला आर.आर. पाटील यांनी तब्बल १९७० मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. सावळज गटात १९७८ मध्ये असलेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार आर. आर. पाटील यांचा विजय फार मोठा मानला गेला होता. जवळपास २००० मतांचे मताधिक्य म्हणजे ते तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य होते.

तो फक्त विजय नव्हता,ती एक घोषणा होती “सावळज बदलतंय!”१९७२ च्या पराभवाचं उट्टं सावळजकरांनी व्याजासकट वसूल केलं होतं.

या विजयामागे रावसाहेब पोळ, रावसाहेब पाटील आणि रघुनाथ केडगे यांची राजकीय चातुर्याची शक्कल होती, आणि सावळजच्या जनतेच्या मनातला अदम्य स्वाभिमान होता. पुढील अकरा वर्षे आर.आर. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून गटाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या कामगिरीने सांगली जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला.

त्यांच्या अभ्यासवृत्ती, प्रभावी भाषणशैली आणि प्रामाणिक कार्यपद्धतीने सगळ्यांचे लक्ष वेधले. वसंतदादा पाटील यांनी त्याच काळात भविष्यवाणी केली होती “हा तरुण राज्याचं भविष्य ठरेल.”

तासगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर या घडामोडींकडे आ.दिनकर आबा पाटील यांचं बारीक लक्ष होतं. त्यांना वाटलं, “शिवाजीराव पाटील यांचा वाढता प्रभाव येत्या काळात आमदारकीसाठी अडचण ठरू शकतो.” त्यामुळे त्यांनी आर.आर. पाटील यांच्या पाठीशी उभं राहून, सावळजच्या सत्तासमीकरणात सूक्ष्म पण निर्णायक बदल घडवला.

पण काळाच्या पोटात अजून काहीतरी दडलं होतं.
१९७८ चा विजय हा एका नव्या अध्यायाची केवळ सुरुवात होती.त्या पानांमागे अजून एक कथा होती जी सावळजच्या आणि तालुक्याच्या राजकारणाचं भविष्य ठरवणार होती. नेमकं त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात काय वादळ निर्माण झालं? सावळज जिल्हा परिषद गटाचे राजकारण आर. आर.पाटलांच्या मुत्सिद्धगिरीने कसं स्वतःभोवती केंद्रित केलं गेलं? वाचूया आता पुढच्या भागात…(क्रमशः)

ज्यांना वरील लेखांमधील माहिती आवडली असेल त्यांनी आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

पुढील भागात, 1985 व 1989 च्या तासगाव विधानसभा निवडणुकीबरोबरच 1992 मधील ती चूरशीची सावळज जिल्हा परिषद निवडणूक

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!