कहाणी सावळज जिल्हा परिषद गटाची ! भाग -2
"गटातील संघर्ष, गुप्त खेळ आणि नव्या युगाची चाहूल"

तासगांव : मिलिंद पोळ, 9890710999
१९७२ साल… सांगली जिल्हा परिषदेच्या सावळज गटात राजकीय वादळ उसळले होते. हा गट पारंपरिकदृष्ट्या कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. परंतु याच निवडणुकीत अशी उलथापालथ झाली, ज्याने तालुक्यातील राजकारणाचा पटच बदलून टाकला. सावळज गावाचे वजन गटात सर्वाधिक असतानाही उमेदवारी कॉंग्रेसने दिली ती वायफळे गावातील शिवाजीराव पांडुरंग पाटील यांना! कारण दोन वरिष्ठ नेत्यांचा वाद आणि पाहुण्यांच्या सांगण्यावरून झालेला निर्णय. शिवाजीराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे उच्चशिक्षित, बुद्धिमान आणि प्रगल्भ तरुण होते. पण सावळजकरांच्या मनात मात्र सल खोलवर रुतला,मोठं गाव असूनही उमेदवारी नाही? त्या काळात पक्षबदलाचं राजकारण नव्हतं. पण राग, शल्य आणि स्वाभिमानाच्या ज्वालांनी सावळजच्या राजकीय मातीला ताप दिला. याच भावनेतून माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी कॉंग्रेसविरुद्धच बंडखोरीचा झेंडा उचलला.
१९७२ च्या निवडणुकीत वायफळेचे शिवाजीराव पाटील विरुद्ध सावळजचे रावसाहेब पाटील ही लढत म्हणजे तालुक्यातील कॉंग्रेस वि. सावळज अभिमान अशी रंगली. तत्कालीन आमदार बाबासाहेब पाटील आणि वसंतदादा पाटील यांना मानणारा मोठा गट शिवाजीरावांच्या मागे होता. त्याचवेळी रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक व अनुयायी त्यांना पाठिंबा देत होते. जातीय समीकरणांचाही फास या निवडणुकीला होता,मराठा विरुद्ध लिंगायत ही निःशब्द रेषा रेखाटली गेली होती. अंजनीचे नारायण दादा पाटील यांनी या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेतली. शेवटी १३०६ मतांच्या फरकाने शिवाजीराव पाटील विजयी झाले आणि सावळजच्या गालावर पराभवाचा चटका बसला. गावागावच्या पारांवर आजही त्या काळातील लोक सांगतात “तो पराभव सावळजला विसरला नाही.”
पराभवानंतर सावळजकरांचा राग आणि खंत दीर्घकाळ कायम राहिला. सिद्धेवाडी मध्यम प्रकल्प उभारणीच्या वेळी तलावाची लांबी ३ मीटरने कमी केली असा आरोप व्हायला लागला. कोणी केली, कशासाठी केली, यावर गावोगावी चर्चा रंगल्या. राजकारण इतके खोलवर गेले की आटपाडी–जोतिबा एस.टी. बससेवा सुरू करणे किंवा थांबवणेही राजकीय शस्त्र ठरले. या सर्व गदारोळात बांधकाम सभापती म्हणून शिवाजीराव पाटील तालुक्यात प्रस्थापित झाले; पण सावळजवरील त्यांचा राग त्यांच्या निर्णयांमधून अनेकदा डोकावत राहिला.
पाच वर्षांनंतर जिल्हा परिषद निवडणुकीची चाहूल लागली. सावळजचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पोळ, रघुनाथराव केडगे आणि रावसाहेब पाटील हे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे निष्ठावान समर्थक होते. मात्र वय आणि वैचारिक मतभेदांनी जुन्या पिढीचे पाय मागे सरकू लागले. दरम्यान येळावीचे बाबासाहेब पाटील आणि रावसाहेब पोळ यांच्यात मतभेद उफाळले, तर चिंचणीचे दिनकर (आबा) पाटील यांना आमदारकीचे वेध लागले. याच गदारोळात तासगांवमध्ये तालुक्यातील प्रमुख नेत्यांची मोठी बैठक झाली. आयोजक होते दिनकर आबा पाटील.
या बैठकीत शांतिनिकेतन, सांगलीत शिकणारा एक तरुण आपल्या दोन मित्रांसह आला होता. नाव, आर.आर. पाटील! रघुनाथ केडगे यांच्या संमतीने त्याने दिनकर आबांसमोर एक तडाखेबंद भाषण केलं. भाषण संपताच सभागृहात कुजबुज सुरू झाली “हा कोणाचा मुलगा?” उत्तर आलं, अंजनीचे रामराव आन्ना पाटील यांचा मुलगा आहे.तेवढ्यात रावसाहेब पोळ यांनी लक्ष दिलं हा मुलगा बोलतो आहे जसा नेता बोलतो.याच क्षणी सावळजच्या राजकीय इतिहासात नवं बीज पेरलं गेलं.
सावळज गटात आर.आर. पाटील यांना पुढे करण्याचा निर्णय पक्का झाला. वायफळच्या शिवाजीराव पाटील यांचा वाढता प्रभाव भविष्यात विधानसभेत अडथळा ठरू शकतो, अशी कुजबुज होती. म्हणूनच दिनकर आबा पाटील यांनी ठरवलं, “या तरुणाला पुढं आणलं पाहिजे.” १९७८ च्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस उमेदवारीची मागणी आर.आर. पाटील यांच्या नावावर निश्चित झाली.
नेमक्या त्याच काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हलकल्लोळ झाला. शरद पवार यांनी वसंतदादा पाटीलांचे सरकार पाडून पुलोदची स्थापना केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले. या घडामोडींनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या वातावरणात अधिकच गडबड निर्माण केली. राज्यभर निवडणूक वारे घोंघावत होते आणि सावळज गटात एका नव्या युगाची चाहूल लागली होती.(क्रमश:)
लेखमधील माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या
9890710999
पुढील भागात वाचा….पराभवाचा सुड आणि आर आर पाटील नावाच्या नव्या युगाचा उदय!



