“मायेचा फराळ” दि सावळज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची माणुसकी उजळवणारी दिवाळी!

तासगाव, रोखठोक न्यूज
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि एकत्रतेचा सण. पण काही घरांवर नुकतंच दुःखाचं सावट आलेलं असतं,अशा घरात सणाचं हास्य हरवून जातं, दिव्यांचा उजेड मंदावतो. त्या काळोखात जर कुणी मायेचा हात पुढं केला, तर तोच खरा दीप उजळतो माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा!
हीच माणुसकी दाखवली आहे दि. सावळज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने.
सोसायटीचे अध्यक्ष विवेक उर्फ राजू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी स्टाफ यांच्या वतीने हा उपक्रम मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आला आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने दुःखद घटना झालेल्या कुटुंबांना मायेचा फराळ देऊन सोसायटीने समाजात मानवीतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक हृदयस्पर्शी संदेश दिला आहे.
विवेक उर्फ राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन अशा कुटुंबांना भेट दिली, त्यांच्याशी संवाद साधला आणि दिवाळीचा फराळ त्यांच्या हातात ठेवला. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले, पण त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटली, ती होती माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेली दिवाळी.
या उपक्रमाबद्दल बोलताना विवेक (राजू) सावंत भावनिक होत म्हणाले,दिवाळी हा आनंदाचा सण असला तरी काही घरं दुःखामुळे शांत असतात. अशा घरांपर्यंत आपण थोडं प्रेम, थोडी माया पोहोचवू शकलो, तर तीच खरी दिवाळी. आपल्याभोवतीच्या दुःखातही आपण सहभागी होणं, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.
सावळज परिसरामध्ये या उपक्रमाचं प्रचंड कौतुक होत असून अनेकांनी तो प्रेरणादायी ठरावा असं मत व्यक्त केलं.गावकऱ्यांनी सांगितलं, “फराळाच्या प्रत्येक घासात या संस्थेची माया आणि आपुलकी मिसळलेली आहे. दुःखातही कुणीतरी आठवलं, हीच खरी दिवाळी.”
दि. सावळज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा हा उपक्रम केवळ सामाजिक कार्य नाही, तर मानवीतेचा सण आहे.दिवाळीच्या प्रकाशात विवेक सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेली ही माणुसकीची दिवाळी खरं तर “अंधारावर प्रेम आणि संवेदनशीलतेच्या प्रकाशाचा विजय” आहे.
हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरावा आणि प्रत्येकाने दुःखात असणाऱ्याच्या जीवनात उजेड फुलवावा, हीच या मायेच्या फराळाची खरी गोडी आहे.



