नेत्याचं ममत्व… कार्यकर्त्याचा त्याग!
वसुबारसेच्या मुहूर्तावर प्रभाकर पाटील श्यामच्या दारी; निष्ठावंत कार्यकर्त्याचा सन्मान

तासगाव,रोखठोक न्यूज
स्वार्थाच्या या युगात, राजकारणात नात्यांना फारशी किंमत उरलेली नाही, पण तासगाव तालुक्यातील निमणी गावात घडलेला एक प्रसंग माणुसकीचं खरं दर्शन घडवून गेला.एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा त्याग आणि त्याच्या नेत्याचं ममत्व.. याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले.
निमणी येथील पै. श्याम उर्फ अथर्व राजमाने हा तिसऱ्या पिढीपासून संजय पाटील यांचा कार्यकर्ता. २००७ साली संजय पाटील आमदार झाल्यापासून श्याम त्यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभा आहे.अलीकडील शेतकरी आंदोलनात संजय पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी हाक दिली आणि ती हाक श्यामने मनापासून ऐकली.
घरातले एकुलतेच बैल औताला जुंपून, स्वतः अनवाणी चालत, भर उन्हात पाच किलोमीटरचा प्रवास करून श्याम तासगावात पोहोचला. त्याचा हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्याच्या त्यागाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि “संजय पाटील यांचा खरा कार्यकर्ता म्हणजे काय” याचा प्रत्यय सगळ्यांना आला.

श्यामच्या या समर्पणाने माजी खासदार संजय पाटील आणि प्रभाकर पाटील दोघेही भारावले. मनात अस्वस्थता निर्माण झाली “आपल्या कार्यकर्त्यासाठी काहीतरी करायलाच हवं.”
आणि मग, वसुबारसेच्या पूर्वसंध्येला, प्रभाकर पाटील यांनी स्वतः श्यामच्या दारी हजेरी लावली.त्याच्या अंगणात नवा बैल उभा केला…क्षणभर सगळं गाव नि:शब्द झालं.

श्यामचे डोळे भरून आले, प्रभाकर पाटील यांच्या हातात कृतज्ञतेने हात गुंफले गेले.राजकारणात नेहमी ऐकायला मिळणाऱ्या ‘स्वार्थी’ नात्यांमधून हा एक वेगळाच प्रकाशझोत झळकला
धन्य तो नेता, ज्याच्या मनात कार्यकर्त्याचं मोल आहे,
आणि धन्य तो कार्यकर्ता, ज्याच्या निष्ठेवर नेत्याचं प्रेम ओथंबून वाहतंय.निमणीतील हा प्रसंग आज संपूर्ण तासगाव तालुक्याच्या चर्चेचा विषय ठरला आहे.कारण इथे फक्त राजकारण नाही, इथे आहे भावनेचा, विश्वासाचा आणि माणुसकीचा विजय!



