# “सावळज जिल्हा परिषद गट : लोकशाहीचा दीप उजळवणारी प्रेरणादायी कहाणी” – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयविशेष वृतान्त

“सावळज जिल्हा परिषद गट : लोकशाहीचा दीप उजळवणारी प्रेरणादायी कहाणी”

मतभेदांतही एकतेचा, विकासाचा सजीव वारसा.

Amazon.in/ONLINE SHOPPING

✍ मिलिंद पोळ, तासगाव
9890710999

गावकुसात रुजली बीजे लोकशाहीची,
लोकल बोर्डांतून उगवली आशा विकासाची…
सावळजच्या मातीने घडवले नेते परखड,
ही कहाणी राजकारणाची नाही,जनतेच्या विश्वासाची अखंड गाथा!

सांगली जिल्हा परिषदेच्या स्थापनेला आता सहा दशकं उलटली आहेत. या काळात अनेक गट, अनेक नेते, अनेक दिशा पाहिल्या; पण काही गटांनी लोकशाहीचं खरं सार जपलं, त्यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे सावळज जिल्हा परिषद गट. तासगाव तालुक्यातील हा गट केवळ राजकीय स्पर्धांसाठी ओळखला जात नाही, तर संस्कार, सुसंवाद आणि एकतेचा आदर्श म्हणून संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया इंग्रज काळातच घालण्यात आला होता. १८८२ साली तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा मसुदा तयार केला. जिल्हा बोर्ड, तालुका बोर्ड आणि ग्रामपातळीवरील प्रतिनिधित्व अशी रचना उभी राहिली. यालाच पुढे “भारताच्या लोकशाहीचं बीज” म्हटलं गेलं. १९३५ च्या कायद्यानं ग्रामपंचायतींना कायदेशीर मान्यता मिळाली आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने या व्यवस्थेला अधिक स्थिर रचना देत “पंचायतराज” प्रणाली लागू केली. त्याच पार्श्वभूमीवर १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम मंजूर केला आणि १ मे १९६२ रोजी सांगली जिल्हा परिषद अस्तित्वात आली.

राज्य निर्मितीपूर्वी दक्षिण सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कार्यरत असलेल्या लोकल बोर्डांत सावळज गट विशेष मानला जात असे. या गटाचे पहिले लोकल बोर्ड सदस्य होते स्व. रावसाहेब (दादा) मुरारराव पोळ. १९५२ ते १९६० या काळात त्यांनी ग्रामीण विकासासाठी आवाज उठवला, शासकीय योजनांना गावपातळीवर पोहोचवण्याचं काम केलं. त्या काळात नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर जबाबदारी असायची हे त्यांच्या कार्यातून दिसून येतं.

स्वातंत्र्यानंतरच्या दशकात लोकशाही संस्थांना आकार येत होता. १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसचे स्व. रावसाहेब उर्फ दरगौंडा रघुनाथ पाटील यांनी विजय मिळवला. सावळज गावातील पहिला व्यक्ती म्हणून जिल्हा परिषदेत पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये अभिमान आणि अपेक्षांचा माहोल होता. त्यांच्या कार्यकाळात गावातील प्राथमिक शाळा, विहिरी, रस्ते, आणि ग्रामविकासाची प्राथमिक पायाभरणी झाली. याच काळात सावळज पंचक्रोशीने “विकास” या शब्दाचा अर्थ अनुभवायला सुरुवात केली.

१९६७ साली झालेल्या दुसऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कॉंग्रेसकडून रावसाहेब (दादा) पोळ उमेदवार होते, तर त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. व्ही. डी. जाधव होते. ही निवडणूक तासगाव तालुक्यातील सर्वाधिक चर्चेची ठरली. चुरशीच्या लढतीनंतर रावसाहेब पोळ अवघ्या ८५ मतांनी विजयी झाले. पण खरी कहाणी निकालानंतर घडली. रात्री उशिरा सांगलीत निकाल जाहीर झाला. विजयी उमेदवारांचे समर्थक गावी जाण्यासाठी बस घेतली. पराभूत उमेदवारांचे समर्थक मात्र थांबले होते. तेव्हा ॲड. जाधव म्हणाले, “अहो ही समोरची बस आपल्याच लोकांची आहे, चला सगळे एकत्र गावाकडे.” रावसाहेब पोळ यांनी स्वतः त्या सर्व समर्थकांसह विरोधकांनाही गुलाल लावून, एकत्र बसमध्ये बसवून गावात नेलं. त्या दिवशी सावळज गावानं लोकशाहीचा खरा अर्थ शिकला, “मतभेद असले तरी मनभेद नाहीत!”

स्व.रावसाहेब पोळ यांनी समाजातील तंटे गावातच मिटवण्याची परंपरा जपली. त्यांच्या पुढाकारामुळे पंचक्रोशीतील अनेक मुलांनी शिक्षणाची दारे उघडली. गावकऱ्यांच्या मतभेदांनाही त्यांनी विकासाच्या गाभाऱ्यात गुंफून एकतेचं सूत्र जपलं. त्यांच्या या काळात सावळज हे नाव जिल्हा परिषद नकाशावर उठून दिसू लागलं. सावळज जिल्हा परिषद गटाचा इतिहास म्हणजे लोकशाही, एकता आणि सामाजिक प्रगल्भतेचा प्रवास आहे. इथे राजकारण पक्षांच्या सीमांनी बांधलेलं नाही, तर लोकांच्या परंपरांनी जोडलेलं आहे. प्रत्येक निवडणुकीत मतांची चुरस असली तरी आपलेपणाचा धागा कधीच तुटला नाही. हा गट म्हणजे राजकारणातली माणुसकी, आणि माणुसकीतली लोकशाही अशा शब्दांत सांगली जिल्ह्यातील अनुभवी कार्यकर्ते या गटाचं वर्णन करतात.

आज नवीन पिढी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गावविकासाचं चित्र रंगवत आहे, पण त्या मागे आहे पोळ-पाटील पिढ्यांनी रुजवलेली लोकशाहीची बीजे. सावळजचा गट आजही तसाच शांत, संयमी आणि सर्वसमावेशक. या गटाचा इतिहास सांगतो, “नेते घडवले जातात निवडणुकीने नव्हे, तर लोकांच्या विश्वासाने.”

वादळं आली, सत्तेची समीकरणं बदलली, पण सावळजची माती मात्र तशीच राहिली. लोकशाहीचा दीप आजही उजळतो आहे. ही कहाणी नाही, ही इतिहासाची शपथ आहे.

सावळज जिल्हा परिषद गट : गावापासून जिल्ह्यापर्यंत लोकशाहीचा प्रवास घडवणारी प्रेरणादायी गाथा!

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!