द्राक्षहंगामात शेतकऱ्यांच्या अडचणींवर आमदार रोहित पाटील यांचा पुढाकार
कृषिमंत्र्यांना भेटून साथी पोर्टलवरील सक्तीबाबत केली आग्रही मागणी

मुंबई : रोखठोक न्यूज
सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी केंद्र चालकांच्या अडचणींची तातडीने दखल घेत आमदार रोहित पाटील यांनी आज मंत्रालयात थेट राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन “साथी पोर्टल २” बाबत आग्रही मागणी केली.
कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी सुरू केलेल्या या पोर्टलच्या अनिवार्य वापरामुळे ग्रामीण भागातील केंद्र चालकांना संगणक, इंटरनेट आणि प्रिंटरच्या अभावामुळे प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवहारात विलंब होत असून शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध होत नाहीत.
आमदार पाटील यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले की, सध्या जिल्ह्यात द्राक्षहंगाम सुरू असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करावी लागत आहे. अशा वेळी त्यांचा मौल्यवान वेळ पोर्टलवरील तांत्रिक प्रक्रियेत वाया जाऊ नये, म्हणून साथी पोर्टलची सक्ती तात्पुरती स्थगित करावी.

या पुढाकाराबद्दल सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधव आणि कृषी केंद्र चालकांनी आमदार रोहित पाटील यांचे आभार मानले असून त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



