जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा ‘मेगा ट्विस्ट’ समीप?
बाबर–रोहित–संजयकाका –अजितराव यांच्या निर्णयावर ठरणार सत्तेचा मुकुट

तासगाव : मिलिंद पोळ
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरू असलेला सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला असून जिल्ह्याच्या राजकीय पटावर थरार शिगेला पोहोचला आहे. आकडेमोडीची गणिते, गुप्त बैठका, सूचक संदेश आणि प्रतिष्ठेच्या लढाया या साऱ्यांमुळे ‘क्लायमॅक्स’ची चाहूल लागली आहे.
या संपूर्ण घडामोडीत चार नावे विशेष ठळकपणे पुढे येत आहेत.राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून माजी खासदार संजय पाटील, शिवसेनेकडून आमदार सुहास बाबर, तासगाव–कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील आणि ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे. या चौघांच्या भूमिकेवरच अध्यक्षपदाचा अंतिम निर्णय अवलंबून राहणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
संजय पाटील यांचा ‘सुसंवाद’
माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असलेला सुसंवाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या अंतिम समीकरणात त्यांचा कल कोणत्या दिशेने झुकतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या एका हालचालीने संपूर्ण राजकीय पट पालटू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
बाबरांचा दबदबा, पण दबावही
आमदार सुहास बाबर सध्या जिल्ह्यातील सर्वाधिक ‘फॉर्म’मध्ये असलेले नेते मानले जातात. खानापूर–आटपाडी मतदारसंघात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आत्मविश्वास शिगेला आहे.
मात्र, अशा पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर भविष्यात त्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कार्यकर्त्यांमधून “भाजपसोबत जाऊ नये” असा स्पष्ट दबाव वाढत असल्याचे बोलले जाते.
रोहित पाटील ठरणार ‘गेमचेंजर’?
तासगाव पंचायत समितीवरील सत्ता गमावली असली तरी आमदार रोहित पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत दमदार कामगिरी करत दहा पैकी सात सदस्य आपल्या गटाचे निवडून आणले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या अंकगणितात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) ची जिल्ह्यातील पक्षाची सूत्रे जरी जयंतराव पाटील यांच्या हाती असली, तरी या घडामोडींमध्ये रोहित पाटील यांच्याकडे समन्वय साधण्याची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद निवडणुकीत संजय पाटील आणि रोहित पाटील हे थेट आमनेसामने होते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी हे दोन गट एकत्र येणार का, की निवडणुकीतील संघर्ष आड येणार हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
अजितरावांचा समतोल
माजी मंत्री अजितराव घोरपडे हे जिल्ह्यातील राजकारणातील संतुलन साधणारे व्यक्तिमत्त्व मानले जाते. विविध गटांशी असलेले त्यांचे संबंध आणि शांतपणे चाल खेळण्याची शैली लक्षात घेता, अंतिम चर्चेत त्यांचा प्रभाव निर्णायक राहू शकतो.
अंकगणित की प्रतिष्ठेचा प्रश्न?
सध्या अध्यक्षपदाचा खेळ केवळ आकड्यांचा नाही, तर प्रतिष्ठेचाही बनला आहे. प्रत्येक गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. मात्र, अंतिम क्षणी एखादा अनपेक्षित निर्णय किंवा आघाडीचा ‘ट्विस्ट’ संपूर्ण समीकरण बदलू शकतो.
आता जिल्ह्याचे राजकारण एका निर्णायक उंबरठ्यावर उभे आहे.
किंगमेकर कोण ठरणार?
पाटील विरुद्ध पाटील संघर्ष हातमिळवणीत बदलेल का? की बाबरांचा निर्णय सर्व गणिते उलथवून टाकेल?
सत्तेच्या या रंगमंचावर पडदा वर जाण्याचीच प्रतीक्षा आहे, आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मुकुट कोणाच्या माथी चढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे!



