जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार पुढे ढकलण्याचे आदेश
शनिवार / सोमवारचे बाजार रद्द

सांगली – रोखठोक न्यूज
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी संबंधित दिवशीचे आठवडा बाजार पुढे ढकलण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यात दि. ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी मतदान, तर दि. ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मतमोजणी होणार आहे. या दोन महत्त्वाच्या दिवशी गर्दी व संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आठवडा बाजार पुढे ढकलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उपजिल्हाधिकारी (महसूल) सांगली यांच्याकडील पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदान व मतमोजणी प्रक्रिया निर्भय आणि सुरळीत पार पडावी, यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.



