सावळजमध्ये प्रचाराचा महाअंतिम डाव; आमदार रोहित पाटीलांच्या सभांनी रंगणार निवडणूक रणधुमाळी

सावळज, रोखठोक न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यातील सावळज जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस चांगलाच तापलेला असून, आमदार रोहित पाटील यांच्या जाहीर सभांनी आज (गुरुवार) प्रचाराचा महाअंतिम डाव रंगणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या निर्धाराने आमदार पाटील यांच्या दोन जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या असून, सावळजसह वायफळे परिसरात मोठी राजकीय गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत.
सायंकाळी ५:३० वाजता वायफळे येथे पहिली जाहीर सभा होणार असून, त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सावळज येथील महादेव मंदिरासमोर जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

सावळज जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विजय धेंडे, सावळज पंचायत समिती गणातून प्रकाश पाटील, तर वायफळे गणातून जितेंद्र उर्फ पंकज झांबरे पाटील हे निवडणूक रिंगणात असून, गेल्या दहा-बारा दिवसांपासून संपूर्ण मतदारसंघात प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडालेला आहे. घरोघरी जाऊन, वैयक्तिक गाठीभेटी घेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवण्यात आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.
मैदानातील प्रचारासोबतच सोशल मीडियावरही आमदार गटाने आक्रमक भूमिका घेतली असून, रिल्स, व्हिडिओ आणि डिजिटल प्रचारातून तरुण मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यात आला आहे. तासगाव तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांमध्ये आज रात्री १० वाजता जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने, आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.
सायंकाळी सावळज येथे होणाऱ्या सभेला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असून, सावळज पूर्व भागातील पाणी योजना, आधुनिक द्राक्ष शेती, युवकांच्या हाताला रोजगार, विविध विकास कामांचा लेखाजोखा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीतील विरोधकांनी केलेल्या आरोपांना आमदार रोहित पाटील काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळासह सामान्य मतदारांचेही लक्ष केंद्रित झाले आहे.
सावळजमध्ये आज होणाऱ्या या जाहीर सभा केवळ प्रचार सभा न राहता, निवडणूक निकालाची दिशा ठरवणाऱ्या ठरतील, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.



