महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरडा : फोडाफोडीच्या राजकारणाने गिळलेली लोकशाही

✍🏻 तासगाव, मिलिंद पोळ
महाराष्ट्राच्या राजकारणाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, हा प्रश्न आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण राजकारणातील मतभेद, संघर्ष, निवडणुका आणि सत्तांतर ही लोकशाहीची नैसर्गिक प्रक्रिया असली तरी गेल्या काही वर्षांत जे काही घडत आहे, त्याने लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
एकेकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार नेहमी म्हणायचे, “राजकारण लय वंगाळ आहे” त्या वाक्याकडे अनेकांनी विनोद म्हणून पाहिले असेल, परंतु आजच्या घडीला त्या वाक्यामागील वास्तव अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. राजकारणातील स्पर्धा, वैचारिक संघर्ष आणि जनहितासाठीची धडपड यांची जागा आता सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याच्या संस्कृतीने घेतल्याचे चित्र दिसत आहे.
महाराष्ट्र हा विचारांचा, सामाजिक परिवर्तनाचा आणि सुसंस्कृत राजकीय परंपरेचा वारसा लाभलेला प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, राजर्षी शाहू महाराजांचे प्रगत धोरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि अनेक थोर नेत्यांनी घडवलेली राजकीय संस्कृती हा महाराष्ट्राचा खरा चेहरा होता. मतभेद होते, पक्ष वेगळे होते, भूमिका वेगळ्या होत्या; पण राजकारणात काही मूल्ये होती, काही मर्यादा होत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विचारधारा होती.
आज मात्र परिस्थिती बदलली आहे. पक्ष कोणता, विचारधारा कोणती, कालची भूमिका काय आणि आजची भूमिका काय, याचे भान अनेकदा उरलेले दिसत नाही. कालपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे, जनतेची फसवणूक केल्याचे आरोप केले जात होते, तेच नेते दुसऱ्या दिवशी पक्ष बदलून सत्ताधाऱ्यांच्या गोटात गेले की अचानक स्वच्छ प्रतिमेचे आणि विकासाभिमुख ठरतात. कालपर्यंत कट्टर विरोधक असलेले लोक एका रात्रीत मित्र बनतात आणि कालचे मित्र दुसऱ्या दिवशी राजकीय शत्रू ठरतात.
सामान्य मतदारांसाठी ही परिस्थिती गोंधळाची आणि निराशाजनक आहे. कारण तो मतदान करताना पक्षाच्या विचारांना, जाहीर केलेल्या भूमिकांना आणि नेत्यांच्या वक्तव्यांना महत्त्व देतो. पण निवडणुकीनंतर घडणाऱ्या राजकीय समीकरणांकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो आपल्या मताचा आणि विश्वासाचा नेमका अर्थ काय?
विशेषतः फोडाफोडीचे राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. मतभेद असले तरी राजकीय विरोधकांना संपविणे, पक्ष तोडणे, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या बाजूला वळवणे, राजकीय अस्तित्व कमकुवत करण्यासाठी सतत सत्तेचा वापर करणे, ही संस्कृती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाशी सुसंगत नव्हती. महाराष्ट्राने संघर्ष पाहिले, निवडणुका पाहिल्या, पराभव आणि विजय पाहिले; पण विचारांच्या लढाईची जागा व्यक्ती आणि पक्ष फोडण्याच्या राजकारणाने घ्यावी, अशी अपेक्षा कधीच नव्हती.
याचा सर्वाधिक फटका बसतो तो तळागाळातील कार्यकर्त्यांना. एखादा कार्यकर्ता वर्षानुवर्षे एका विचारासाठी, एका पक्षासाठी आणि एका नेतृत्वासाठी काम करतो. त्याग करतो, संघर्ष करतो, समाजात भूमिका मांडतो. परंतु ज्यांच्याविरोधात तो आयुष्यभर लढला, तेच लोक दुसऱ्या दिवशी त्याच्या पक्षात येऊन सन्मानाची पदे मिळवतात. अशा वेळी त्या कार्यकर्त्याच्या निष्ठेची किंमत काय उरते?
आज महाराष्ट्रातील राजकारण पाहताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात वाढत चाललेली अस्वस्थता ही केवळ एखाद्या पक्षाविरोधातील भावना नाही. ती लोकशाहीबद्दल निर्माण होणारी चिंता आहे. कारण लोकशाही केवळ निवडणुकांचे नाव नाही. लोकशाही म्हणजे जनतेचा विश्वास, शब्दाला असलेली किंमत, नैतिकतेचे भान आणि जनादेशाचा सन्मान.
इतिहास सांगतो की कोणतीही सत्ता कायमस्वरूपी नसते. सामर्थ्य, संपत्ती, बहुमत आणि प्रभाव यांच्या बळावर अनेक साम्राज्ये उभी राहिली, परंतु काळाच्या कसोटीवर ती टिकली नाहीत. ब्रह्मदेवाकडून वरदान लाभलेला दशानंद रावणही आपल्या अहंकारामुळे वाचू शकला नाही. सोन्याची लंका राख झाली. कारण सत्तेपेक्षा मोठी गोष्ट असते ती जनतेची भावना आणि काळाचा न्याय.
याच कारणामुळे आज अनेक नागरिकांच्या मनात एक भीती निर्माण होत आहे. समाजातील असंतोष, बेरोजगारी, वाढती आर्थिक विषमता, राजकीय दुटप्पीपणा आणि लोकशाही संस्थांबद्दल कमी होत चाललेला विश्वास या सगळ्याचा उद्रेक जर एखाद्या दिवशी एकत्र झाला, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. इतिहासात अनेक देशांमध्ये जनतेच्या रोषाने मोठे राजकीय बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनीही लोकांच्या मनातील असंतोष गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
कारण लोकशाहीची खरी ताकद सत्तेच्या खुर्चीत नसते; ती जनतेच्या विश्वासात असते. आणि जेव्हा जनतेला असे वाटू लागते की तिच्या मताचा, तिच्या आशेचा आणि तिच्या विश्वासाचा सतत अवमान होत आहे, तेव्हा लोकशाहीसमोर गंभीर प्रश्न उभे राहतात.
आज महाराष्ट्राला नव्या राजकीय घोषणांची गरज नाही. नव्या पक्षांचीही गरज नाही. गरज आहे ती राजकीय प्रामाणिकपणाची. विचारधारेप्रती निष्ठेची. जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखण्याची. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेपेक्षा लोकशाही मोठी आहे, याची जाणीव ठेवण्याची.
महाराष्ट्र ही केवळ सत्तेची प्रयोगशाळा नाही. ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि स्वाभिमानाची भूमी आहे. या भूमीने अनेकांना सत्तेच्या शिखरावर पोहोचवले आहे; पण गरज पडली तेव्हा त्यांना खाली उतरवण्याचे सामर्थ्यही दाखवले आहे.
सत्ता येते आणि जाते. पक्ष बदलतात. चेहरे बदलतात. घोषणाही बदलतात. परंतु जनतेचा विश्वास एकदा तुटला, तर तो पुन्हा मिळवणे अत्यंत कठीण असते. म्हणूनच आजचा खरा प्रश्न कोण सत्तेत आहे हा नाही; तर महाराष्ट्राच्या राजकारणात उरलेले विचार, मूल्ये आणि नैतिकता वाचवण्यासाठी कोण पुढे येणार, हा आहे.
याचे उत्तर आज नाही मिळाले, तरी उद्या इतिहास नक्कीच मागेल.



