# पराभवातून उभारी; जिल्हा परिषदेत बहुमताची छाप, पुढील लढाई अधिक जोमात : आ. रोहित पाटील – रोखठोक न्युज
आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पराभवातून उभारी; जिल्हा परिषदेत बहुमताची छाप, पुढील लढाई अधिक जोमात : आ. रोहित पाटील

सात गटांत विजय, कवठेमहांकाळ पंचायत समितीवर एकहाती सत्ता; तासगावातील निकाल आत्मचिंतनाचा धडा

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

तासगाव–कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व तासगाव नगरपालिका निवडणुकांनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात आमदार रोहित पाटील यांनी पराभवातून उभारी घेण्याचा निर्धार व्यक्त करत संघटन बळकटीचा ठाम संदेश दिला. तासगाव पंचायत समितीतील पराभवाची नैतिक जबाबदारी माझी आहे; मात्र हा पराभव पुढील विजयाची पायाभरणी ठरेल,असे ते म्हणाले.

तासगाव येथील मार्केट कमिटी आवारात झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विजयी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच नगरसेवकांचा शाल व आंब्याचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.

आमदार पाटील यांनी आपल्या भाषणात निकालाचे सर्वंकष विश्लेषण मांडताना स्पष्ट केले की, तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले आहे. दहा जिल्हा परिषद गटांपैकी तब्बल सात गटांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले असून, कवठेमहांकाळ पंचायत समितीवर पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. ही जनतेच्या विश्वासाची पावती आहे,असे ते म्हणाले.

तासगाव पंचायत समितीतील पराभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर पक्षाला एकूण मिळालेली मते अधिक आहेत. आकडेवारी सांगते की जनाधार कमी झालेला नाही; मात्र काही ठिकाणी सूक्ष्म पातळीवर झालेल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा असला तरी निराश करणारा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांच्या नाराजीवर भाष्य करताना ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांना संधी देणे शक्य नसते. एखाद्या वेळी संधी मिळाली नाही म्हणून भविष्यातही मिळणार नाही असे नाही. संघटना ही निष्ठा, शिस्त आणि सातत्यपूर्ण कामावर उभी असते. कठीण काळात पक्षासोबत ठाम उभे राहणाऱ्यांनाच पुढील संधी व जबाबदाऱ्या दिल्या जातील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी पंचायत समितीतील निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याची कबुली देत, १९९२ नंतर प्रथमच मतदारांनी वेगळा कौल दिला. जिल्हा परिषदेत भरघोस यश दिले, तर पंचायत समितीत मिश्र निकाल दिला. विजयी सदस्य दोन्ही तालुक्यांच्या विकासाला गती देतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, साहेबराव पाटील, मोहन पाटील, ताजुद्दीन तांबोळी, विश्वास पाटील, गजानन खुजट, ॲड. संजय सावंत, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, नानासाहेब वाघमारे, स्वप्निल जाधव, नितीन तारळेकर, बाळासाहेब पोळ, नलिनी पवार, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

निकालाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक एकजूट आणि जनसंपर्क वाढवून आगामी निवडणुकांत अधिक भक्कम कामगिरी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!