‘सुंदर गाव’ योजना बंद आबांच्या विचारांची हत्या! राज्यभरात असंतोषाचा ज्वालामुखी!

तासगाव, मिलिंद पोळ
राज्य सरकारने “आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना” ही योजना रद्द करून ती “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान”मध्ये विलीन करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ प्रशासकीय नाही, तर भावनिक आघात आहे. हा निर्णय आबा पाटील यांच्या कार्याला, त्यांच्या विचारधारेस आणि त्यांच्या ग्रामविकास स्वप्नाला चपराक देणारा आहे.
स्व. आर.आर. (आबा) पाटील हे नाव म्हणजे प्रामाणिकतेचं, साधेपणाचं आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचं प्रतीक. त्यांनी “सुंदर गाव” ही योजना सुरू केली, ती केवळ पुरस्कारासाठी नव्हती, तर ती होती गाव बदलण्याची क्रांती. प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रेरणा देणारी, जनतेच्या सहभागातून उभी राहिलेली ती योजना आज अचानक बंद करणं म्हणजे ग्रामविकासाच्या आत्म्याला गळा घोटण्यासारखं आहे.
राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे एका दिवंगत नेत्याच्या पुण्याईवर पाय देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्या नावे आणि विचारांवर गेली दहा वर्षाहून अधिक काळ अनेकांचे राजकारण फुलत राहिले, त्या आबांच्या नावे सुरू असलेली योजना बंद करणं म्हणजे त्यांच्या विचारांची थट्टा करणं आहे.

याहूनही अधिक खेदाची बाब म्हणजे, तासगाव तालुक्याबरोबरच संपूर्ण राज्यातील आबा प्रेमिक आज असंतोषाने पेटलेले असताना, तासगावातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ज्यांनी आबांच्या नावावर राजकारण केलं त्यांच्याकडून आजवर एकही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही! तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळेच गप्प आहेत. ही शांतता संशयास्पद आणि मन खिन्न करणारी आहे.
आणखी धक्कादायक म्हणजे, स्वर्गीय आबांचे पुत्र व विद्यमान आमदार रोहित पाटील यांनीदेखील अद्याप मौन पाळले आहे. त्यांच्या प्रतिक्रियेची सर्वत्र चर्चा सुरू असून, मतदारसंघात उलटसुलट कुजबुज सुरु झाली आहे. “आबांच्या कार्याचा सन्मान आता कोण करणार?”
हा निर्णय केवळ एका योजनेचा अंत नाही, तर एका विचारसरणीचा अंत आहे. आबा पाटील यांच्या स्मृतीशी, त्यांच्या कार्याशी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या या निर्णयाचा तीव्र निषेध झाला पाहिजे. कारण “सुंदर गाव योजना” बंद करणं म्हणजे आबा पाटील यांच्या स्वप्नांची हत्या आणि ही हत्या शांतपणे पाहणं, हे प्रत्येक आबा अनुयायासाठी लज्जास्पद ठरेल!



