तासगावातून भाजपच्या नव्या युगाची सुरुवात! पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
“सेल्फी नव्हे, सेवा राजकारण हा पक्ष कार्यकर्त्यांचा, विचारांचा आणि देशहिताचा”

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगावात भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाच्या भव्य उद्घाटनाने तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या उत्साहाची लाट उसळली आहे. राज्याचे उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते हा सोहळा अत्यंत दिमाखात आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पार पडला. भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोर्चा, युवक मोर्चा तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्याने तासगावातील संघटनात्मक बळकटीचा नवा अध्याय सुरू झाल्याचं मत सर्वत्र व्यक्त होत आहे.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले,
भारतीय जनता पक्ष हा व्यक्तींचा नव्हे, तर विचारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. काही जण आज राजकारणात सेल्फी आणि प्रसिद्धीपुरते येतात, पण भाजप कार्यकर्त्यांच्या घामावर उभा आहे. मोदीजींनी गेल्या दहा वर्षांत देशाला मजबूत नेतृत्व दिलं, २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर काढलं, कोट्यवधी घरांना गॅस आणि शौचालय सुविधा दिल्या. कलम ३७० रद्द करून जम्मू-कश्मीरचे संपूर्ण एकात्मीकरण घडवून आणलं. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत आज चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून, २०३० पर्यंत आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेमुळे सांगोला आणि आटपाडीपर्यंत पाणी पोहोचलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास सुरू आहे. विकास हीच आमची दिशा आहे आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर भाजपचं भविष्य उभं आहे. तासगावातून आज भाजपच्या नव्या युगाची सुरुवात होत आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाप्रमुख ॲड. स्वप्नील पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले,पालकमंत्री दादांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तालुक्यात भाजपची संघटना चारीपट वाढली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत विकास निधी पोहोचला आहे. विरोधक सोशल मीडियावर टीका करण्यात व्यस्त असतात, पण भाजपचा कार्यकर्ता प्रत्यक्ष लोकांच्या दारी सेवा घेऊन जातो. आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आपण पूर्ण ताकदीने सज्ज आहोत.”
उद्घाटन सोहळ्यादरम्यान परिसर “भारत माता की जय” घोषणांनी दुमदुमून गेला. भाजप कार्यकर्त्यांच्या एकजुटीने आणि जोशात पार पडलेल्या या कार्यक्रमाने तासगावात पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा नवा अध्याय लिहिला गेला. राजकारणात केवळ आरोप-प्रत्यारोप नव्हे, तर विकास आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हाच भाजपचा खरा चेहरा असल्याचं या सोहळ्यातून ठळकपणे दिसून आलं.



