# सावळजच्या सुपुत्रास विनम्र अभिवादन – रोखठोक न्युज
आपला जिल्हाविशेष वृतान्त

सावळजच्या सुपुत्रास विनम्र अभिवादन

प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, रोखठोक न्यूज

सावळज (ता. तासगाव)गावचे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच स्व. अनिल थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने थोरात कुटुंबीयांकडून गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणप्रेमी स्व. थोरात यांची आठवण ताजी करण्यात आली.

गतवर्षी अनिल थोरात यांचे आकस्मिक निधन झाले होते. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम या त्रिसूत्रीच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या थोरात यांनी आपल्या उद्योगशीलतेबरोबरच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही अनेक उपक्रमांना गती दिली होती. समाजातील प्रत्येक घटकाला आधारवड ठरलेले हे व्यक्तिमत्त्व अचानक हरपल्याने निर्माण झालेली पोकळी आजही भरून निघालेली नाही, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

शनिवारी दुपारी सावळज येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात स्व.अनिल थोरात यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कुटुंबीयांनी पुष्पांजली वाहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, प्रांताधिकारी सचिन गिरी यांच्यासह तासगाव तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, शैक्षणिक व सामाजिक संस्था, विविध संघटनांचे पदाधिकारी , शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.रोहित पाटील म्हणाले, “अनिल थोरात यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांनी अल्पावधीत समाजकारण, उद्योजकता आणि लोकहिताच्या उपक्रमातून गावाला नवी दिशा दिली. त्यांचे आकस्मिक जाणे ही केवळ सावळजच नव्हे तर संपूर्ण परिसरासाठी अपरिमित हानी आहे. त्यांच्या आठवणी प्रेरणादायी असून त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे.”


मान्यवरांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत स्व. थोरात यांच्या सहवासातील क्षण कथन केले. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या धाडसी निर्णयक्षमता, मित्रपरायणता, तसेच गरजूंना मदतीसाठी सदैव तत्पर असलेली त्यांची वृत्ती याबद्दल उपस्थितांनी विशेष उल्लेख केला.

हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या पुण्यस्मरण सोहळ्याचे वातावरण अत्यंत भावपूर्ण झाले होते. गावातील तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच मोठ्या श्रद्धाभावाने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. शालेय साहित्य वाटपाच्या उपक्रमामुळे शिक्षणाची गोडी वाढावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रगतीचा मार्ग सापडावा, हा स्व. थोरात यांचा कायमस्वरूपी संदेश असल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले.

सावळजसह पंचक्रोशीत अनिल थोरात हे नाव मेहनती, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून घेतले जाते. म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावकऱ्यांसह मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना अश्रूंनी ओथंबून वाहिल्या. या स्मरणसोहळ्यातील भावनिक वातावरणाने थोरात यांच्या जीवनकार्याला खरी आदरांजली अर्पण झाली.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!