महावितरणचा ट्रान्सफॉर्मर ठेकेदाराकडून परस्पर स्थलांतर
तासगांव महावितरण मधील प्रकार ; मनसेच्या निवेदनानंतर चौकशीचें आदेश.
तासगाव, रोखठोक न्यूज नेटवर्क
माळवाडी (ता. पलूस) येथील एका जागेवरील ट्रान्सफॉर्मर शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका जागेवरुन दुसर्या जागी अनाधिकृतपणे स्थलांतर करण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी मनसेचे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी आवाज उठवल्यानंतर महावितरणकडून याची पाहणी करण्यात आली. यावेळी महावितरणच्या लक्षात हा धक्कादायक प्रकार आला. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी कोल्हापूर महावितरण मुख्य अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आल्याचे अधिक्षक अभियंता यांनी पत्रात म्हटलेआहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील संबंधीत ठेकेदार हा समर्थ इलेक्ट्रीकल्स नावाने महावितरण मध्ये काम करत आहे. तासगाव महावितरणमधील अनेक कामे याच्या कार्यालयातून होत असतात. यासाठी येथील अधिकारी नागरीकांना संबंधीत ठेकेदाराची भेट घेण्यासाठी पाठवत असतात. अशी तक्रार मनसेकडे आली होती.
यानंतर माहिती घेतली असता संबंधीत ठेकेदार महावितरण विभागातील अनेक कामे अनाधिकृत करुन लोकांची फसवणूक करत असल्याचे दिसून आले. तर याचशिवाय अधिकार्यांना हाताशी धरुन त्याने अनेक साहित्य जुने वापरुन त्याची बिले मात्र नवीन साहित्याप्रमाणे काढली आहेत. तर माळवाडी येथील एक ट्रान्सफॉर्मर शासनाची कोणतीही परवानगी न घेता एका जागेवरुन दुसर्या जागी स्थलांतरीत केला आहे.याबाबत मनसेच्या तक्रारीनंतर अधिक्षक अभियंता यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. यावेळी या ठेकेदाराने शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार केल्याचे दिसून आले.
याप्रकरणी संबंधीत ठेकेदाराचा परवाना रद्द करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करु, असा इशारा काळे यांनी दिला आहे.दरम्यान महावितरणकडून संबंधीत ठेकेदाराला विचारणा केली असता राजकीय दबाव व महावितरण कंपनीकडून परवानगी मिळण्यापूर्वी काम करण्याबाबत दबाव आल्याने काम केले असल्याचे सांगण्यात आले.
अधिकार्यांना अलिशान गाड्या, परदेश सहली
दरम्यान काळे म्हणाले, संबंधीत ठेकेदाराने महावितरण विभागामध्ये अधिकार्यांना हाताशी धरुन अनेक गैरप्रकार केले आहेत. यासाठी त्याने अनेक अधिकार्यांना अलिशान चारचाकी गाड्या, परदेश सहली दिल्या आहेत. तर यातून त्याने मिळवलेल्या पैश्यातून पेट्रोल पंप, जमिनी, सोने, बंगला अशी माया गोळा केली आहे.
संबंधित ठेकेदाराने केलेले काम अनधिकृत आहे. सदर ट्रान्सफॉर्मर ऊर्जान्वित करण्याची कोणतीही परवानगी या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नव्हती. त्यामुळे संबधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– एस. एस. राठोड (विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, मिरज)




