सौ.मच्छगंधाली तारळेकर यांना विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी
उगवाई नियतकालिकाचा अभ्यास” प्रबंधास शिवाजी विद्यापीठाची गौरवपूर्ण मान्यता

“
तासगाव,रोखठोक न्यूज
सावळज (ता. तासगाव) येथील श्री. रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती मच्छगंधाली नितीन तारळेकर यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून विद्यावाचस्पती (Ph.D.) ही प्रतिष्ठेची पदवी बहाल झाली आहे.
“उगवाई नियतकालिकाचा अभ्यास” या विषयावरील त्यांचा प्रबंध शैक्षणिक पातळीवर उच्च दर्जाचा ठरला असून विद्यापीठाने त्यास विशेष मान्यता प्रदान केली आहे.
विशेष म्हणजे, “उगवाई” हे नियतकालिक इ.स. 1988 ते 1994 या कालावधीत सांगली जिल्ह्यातून प्रकाशित होत होते. या सहा वर्षांच्या प्रकाशनकाळाचा त्यांनी तपशीलवार अभ्यास करून साहित्यिक, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भांचा शोध घेतला आहे.
या संशोधनाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. सविता व्हटकर (भोगावती) यांनी केले. संशोधन प्रक्रियेदरम्यान विषयाचा सूक्ष्म अभ्यास, संदर्भग्रंथांचे विश्लेषण आणि प्रबंधाची शिस्तबद्ध मांडणी यामुळे हा प्रबंध विशेषत्वाने उठून दिसला.
पदवीप्राप्तीची घोषणा होताच परिसरात कौतुकाची आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. विविध मान्यवर, समाजसेवी संस्था आणि ग्रामस्थांकडून श्रीमती तारळेकर यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या यशाने स्थानिक शैक्षणिक क्षेत्राला प्रेरणादायी दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी वर्गानेही त्यांच्या यशाचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या परिश्रमांमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात भर पडल्याचे प्राध्यापकांनी गौरवोद्गार काढले.
संशोधन प्रवासात माजी सरपंच नितीन तारळेकर यांनी सातत्याने साथ व प्रोत्साहन दिले. घर-परिवार आणि अध्यापनाची जबाबदारी सांभाळत केलेले हे संशोधन त्यांच्या जिद्दीचे, कष्टाळूपणाचे आणि ध्येयवेडेपणाचे जिवंत उदाहरण असल्याचे सहकाऱ्यांनी नमूद केले.
“उगवाई नियतकालिकाचा अभ्यास” हा प्रबंध मराठी साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योगदान मानला जात असून पुढील संशोधनासाठी त्यांनी उभा केलेला आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.



