तासगावात आमसभेसाठी सोमवारपासून उपोषण
रोहित पाटीलाना क्रिकेट खेळायला वेळ आहे पण आमसभा घ्यायला वेळ मिळेना : जोतिराम जाधव ; आमसभा घेण्यास आमदार टाळाटाळ करत असल्याचा आरोप

तासगाव : प्रतिनिधी
तासगाव तालुक्यात गेल्या तीन – चार दशकात आमसभा झाली नाही. येथील आमदारांनी वेळोवेळी आमसभा घेण्यास टाळाटाळ केली आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांना भिडण्याचे धाडस त्यांनी कधी दाखवलेच नाही. विद्यमान आमदार रोहित पाटील हेही आमसभा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे तासगाव तालुक्यात तातडीने आमसभा घ्यावी, या मागणीसाठी सोमवार दि. 3 मार्चपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे, अशी माहिती शेतकरी नेते जोतिराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, तासगाव तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा आहे. येथील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्यांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. रोहित पाटील हे सर्वात तरुण आमदार म्हणून देशभर मिरवत आहेत. मात्र तासगाव तालुक्यातील समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही. गोरगरिबांच्या तक्रारी ऐकायला त्यांना वेळ नाही. लोकांचा फोनही ते उचलत नाहीत. आमदारकीच्या विजयानंतर ते हवेत गेले आहेत. त्यांचे पाय जमिनीवर टेकायला तयार नाहीत.
गेल्या अनेक दशकात रोहित पाटील यांच्याच घरात आमदारकी आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी राज्यातील अनेक महत्वाची पदे भूषवली आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री अशी अनेक पदे त्यांच्या रूपाने तालुक्याला मिळाली. मात्र तालुक्याचा, मतदारसंघाचा अपेक्षित विकास झाला नाही. उलट शेजारील पलूस, कडेगाव, खानापूर – विटा हे तालुके आपल्या पाठीमागून पुढे गेले.
ते म्हणाले, तालुक्यात कसलीही रोजगार निर्मिती झाली नाही. हाताला काम नसल्याने सुशिक्षित तरुण देशोधडीला लागले आहेत. त्यातून गुन्हेगारीही वाढत आहे. शेती, पाणी, वीज, रस्ते याची बिकट अवस्था आहे. सहकाराला घरघर लागली आहे. सूतगिरणी अनेक वर्षे झाली बंद आहे. विस्तारित बाजार समितीच्या बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारी आहेत. कारखान्याची वाईट अवस्था आहे. आर. आर. पाटलांपासून सगळ्यांनी एमआयडीसीचे गाजर दाखवले. ती अद्याप कागदावरच आहे. एकूणच तालुक्याची सर्वच बाबतीत पिछेहाट सुरू आहे.
सरकारी अधिकाऱ्यांवर तर कोणाचाच वचक नाही. प्रशासन मुजोर बनले आहे. अधिकारी निर्ढावले आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. सामान्य लोकांना छोट्या – छोट्या कामासाठी महिनोंमहिने सरकारी कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. सगळीकडे एजंटांनी धुमाकूळ घातला आहे. सामान्य लोकांची कोणीही दाद घेत नाही. पैसे दिल्याशिवाय एकाही सरकारी कार्यालयात कामं होत नाहीत. या सगळ्या प्रश्नांची कोणीही दखल घेत नाही.
ते म्हणाले, तालुक्यातील जलजीवन व रस्त्यांची कामे मुदतीत होत नाहीत. याप्रकरणी एकाही ठेकेदारावर कारवाई झाली नाही. बाजार समितीत बेदाण्याची प्रचंड उधळण होते. 21 दिवसात शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे दिले जात नाहीत. जिल्हा बँकेतून कर्ज कमी करतो म्हणून शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात. विविध बोगस कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. तालुक्यात मटका, गांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. हॉटेल, धाब्यांवर सर्रास दारूची विक्री होते.
अवैध माती, वाळूचे रात्रंदिवस उत्खनन सुरू आहे. दुधाचा दर, वजन काटे, फॅट यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. दुधामध्ये प्रचंड भेसळ आहे. तालुक्यातील गल्लीबोळातून औषध कंपन्या तयार झाल्या आहेत. यातील अनेक कंपन्यांकडे परवाने नाहीत. कोणतेही उत्पादन शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. याशिवाय पानंद रस्ते, रेशन कार्ड, भूमी अभिलेखकडील रस्ते व मोजणीची प्रकरणे, सावळजमधील प्रस्तावित पोलीस ठाणे अशा अनेक समस्या तालुक्यात भेडसावत आहेत.
या समस्यांना आमदार म्हणून रोहित पाटील यांनी भिडले पाहिजे. लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांनी आमसभा घ्यावी, अशी मी मागणी केली होती. मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे सोमवार दि. 3 मार्चपासून येथील तहसील कार्यालयासमोर मी आमरण उपोषण करीत आहे.
रोहित पाटलांना क्रिकेट खेळायला वेळ आहे पण आमसभा घ्यायला वेळ मिळेना : जोतिराम जाधव
तासगावात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत येऊन आमदार रोहित पाटलांना क्रिकेट खेळायला वेळ आहे. मात्र तालुक्यातील सामान्य लोकांच्या प्रश्नांशी भिडायला त्यांच्याकडे वेळ नाही. गोरगरीब लोकांच्या जीवन – मरणाचे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे ते बघत नाहीत. आमसभेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवावेत, अशी माझी भावना आहे. मात्र क्रिकेट खेळायला वेळ असणाऱ्या आमदार रोहित पाटील यांना आमसभा घ्यायला वेळ नाही, अशी टीका जोतीराम जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली.



