सावळजचा गड : निष्ठा, महत्त्वाकांक्षा आणि आबांची राजकीय खेळी
कहाणी सावळज जिल्हा परिषद गटाची - (भाग -५)

तासगाव, मिलिंद पोळ 9890710999
१९७८ ला सावळज जिंकल्यानंतर आणि १९८९ ला तासगाव विधानसभा जिंकल्यावर आर. आर. (आबा) पाटील यांचे नेतृत्व निर्विवाद ठरले होते.मात्र राजकारणात खरी कसोटी सत्ता मिळाल्यानंतरच सुरू होते.ज्या हातांनी त्यांना वर उचलले, त्याच हातांमध्ये आता अस्वस्थता होती.
आणि याच पार्श्वभूमीवर १९९२ ची जिल्हा परिषद निवडणूक केवळ एक निवडणूक न राहता निष्ठा विरुद्ध महत्त्वाकांक्षा यांची थेट राजकीय लढाई बनली.
पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर अवघ्याच काही काळात १९९२ ची जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. आमदारपदाची जबाबदारी वाढलेल्या आर. आर. (आबा) पाटील यांच्यासाठी सावळज हा आपला होमग्राउंड राखणे ही गरज होती, पण तेवढेच ते मोठे आव्हानही होते.
ज्या सावळज गावाने आर. आर. (आबा) पाटील यांना जिल्हा परिषदेमार्फत राजकीय पटलावर आणले आणि तालुक्याचा आमदार घडवला, त्याच सावळज जिल्हा परिषद गटातून आता उमेदवार कोण? यावर तर्कवितर्क सुरू झाले.
गावातील ज्येष्ठ नेते रावसाहेब पोळ, रावसाहेब पाटील देशभक्त, रघुनाथ केडगे यांसारख्या मार्गदर्शकांशी आबा सखोल चर्चा करत होते.काँग्रेसकडून सावळज जिल्हा परिषद उमेदवारीसाठी मोठी खलबते सुरू होती. सावळजमधील ज्येष्ठ मंडळींनी रावसाहेब पोळ यांचे चिरंजीव दिलीप पोळ यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह काँग्रेस नेतृत्वाकडे धरला. त्याबाबत पक्षाकडे रीतसर अर्जही करण्यात आला. त्याचवेळी पर्याय म्हणून डॉक्टर बी. वाय. पोळ यांचे नावही पुढे आले.
मात्र इथेच आर. आर. (आबा) पाटील यांच्या राजकारणातील दूरदृष्टी स्पष्ट दिसू लागली.कोणत्याही प्रस्थापित घराण्याऐवजी सर्वसामान्य घरातील उमेदवार देऊन भविष्यात सावळज गटातून कोणतेही राजकीय आव्हान उभे राहू नये, या धोरणातून आबांनी नव्या उमेदवाराचा शोध सुरू केला होता.दरम्यान, ज्येष्ठ मंडळींनी सुचवलेले उमेदवार आबांच्या भविष्यातील राजकारणासाठी अडचणीचे ठरू शकतात, हे त्यांना स्पष्टपणे जाणवत होते.
१९८९ च्या विधानसभा निवडणुकीत आर. आर. (आबा) पाटील यशस्वी झाल्यानंतर माजी आमदार दिनकर आबा पाटील यांचा गट पुन्हा सक्रिय झाला होता आणि थेट आव्हान उभे करण्याच्या तयारीत होता. त्यामुळे १९९२ ची निवडणूक आबांसाठी अत्यंत अटीतटीची बनली.
अखेरीस मोठ्या राजकीय खेळीनंतर काँग्रेस पक्षाने दिलीप पोळ आणि डॉक्टर बी. वाय. पोळ या दोघांनाही उमेदवारी नाकारली. आर. आर. (आबा) पाटील यांनी नवीन तरुण चेहरा म्हणून वसंत सावंत यांचे नाव अंतिम केले.
या निर्णयामुळे रावसाहेब पोळ आणि काही ज्येष्ठ मंडळी दुखावली गेली.हीच नाराजी हेरत माजी आमदार दिनकर आबा पाटील यांनी सावळजमधील ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला आणि डॉक्टर बी. वाय. पोळ यांची अपक्ष उमेदवारी निश्चित केली. प्रत्यक्षात डॉ. पोळ यांची इच्छा नसतानाही त्यांना निवडणुकीत उतरवण्यात आले.
१९८९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन वर्षांतच सावळज जिल्हा परिषद गटात निवडणुकीची हवा जोरात वाहू लागली.
काँग्रेसचे वसंत सावंत विरुद्ध दिनकर आबा पाटील समर्थित डॉक्टर बी. वाय. पोळ अशी तुल्यबळ लढत उभी राहिली.
निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सावळज गावातील वातावरण कमालीचे तापले होते. निवडणूक हातातून जात असल्याचे लक्षात येताच आबांनी “रयत विरुद्ध सरकार” असा प्रभावी राजकीय पॅटर्न खुबीने राबवला, असे त्याकाळातील जाणकार सांगतात.आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला.
१९९२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत वसंत सावंत तब्बल ३७०० मतांनी विजयी झाले. डॉक्टर बी. वाय. पोळ यांचा पराभव ज्येष्ठ मंडळींच्या जिव्हारी लागला.
१९८९ मध्ये एकतर्फी असलेले सावळज गाव १९९२ नंतर दोन स्पष्ट गटांत विभागले गेले.निवडणुकीनंतर आर. आर. (आबा) पाटील यांनी नाराज ज्येष्ठ मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी त्यांना यशही मिळाले.
पण ही निवडणूक आबांनी आपल्या राजकीय भविष्याची तरतूद म्हणूनच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लढवली होती. राजकारणात कोणावरही अवलंबून राहायचे नाही आणि समोरच्याला मर्यादित ठेवायचे कसब त्यांनी अचूक ओळखले होते.
यानंतर आबांचा राजकीय आलेख कायम चढताच राहिला.
१९९७ ची जिल्हा परिषद निवडणूक सावळज गटासाठी इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित होती. लढत पुन्हा आर. आर. (आबा) पाटील गट विरुद्ध माजी आमदार दिनकर पाटील गट अशीच होती.आबा गटाकडून किशोर उनउने, तर विरोधी गटाकडून इराप्पा देसाई मैदानात होते.या निवडणुकीत किशोर उनउने २३६५ मतांनी विजयी झाले आणि सावळजवर आबांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले.
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत आर. आर. (आबा) पाटील तिसऱ्यांदा आमदार झाले. ही लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे आबा विरुद्ध काँग्रेसचे संजय काका पाटील अशी होती. पहिल्यांदाच आबा अत्यंत काठावर विजयी झाले आणि संजय काकांनी त्यांना चांगलाच घाम फोडला.यानंतर राज्यात काँग्रेस–राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. आर. आर. (आबा) पाटील यांना पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळाली.

लोकाभिमुख निर्णय, अभिनव योजना आणि ग्रामस्वच्छता अभियानामुळे ते राज्यभर चर्चेचा विषय बनले.
अशातच २००२ ची जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक संजय काका पाटील यांनी प्रतिष्ठेची केली. सावळज गटात राष्ट्रवादीकडून प्रवीण धेंडे तर काँग्रेसकडून ॲड. मिलिंद झेंडे आमनेसामने होते.प्रत्यक्षात ही लढत मंत्री आर. आर. (आबा) पाटील विरुद्ध संजयकाका पाटील अशीच होती.
निकाल पुन्हा आबांच्या बाजूने लागला. प्रवीण धेंडे यांनी २२०० मतांनी विजय मिळवून सावळज हा आबांचा अभेद्य बालेकिल्ला असल्याचे पुन्हा सिद्ध केले. पुढे प्रवीण धेंडे यांना सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली, मात्र त्यानंतर ते राजकीय पटलावरून अनपेक्षितरीत्या गायब झाले.
यानंतर २००४ मध्ये आर. आर. (आबा) पाटील चौथ्यांदा आमदार झाले आणि पुढे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीपदापर्यंत मजल मारली.
सावळज जिल्हा परिषद गटाचा पुढील इतिहास पुढील भागात…
२००७ ची वादग्रस्त बिनविरोध निवडणूक आणि २०१२ मध्ये मिळालेले रेकॉर्डब्रेक मताधिक्य
हा थरार पुढे आणखी गडद होणार आहे…
वरील लेखातील माहिती आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.. 🙏🏻



