# सावळज जिल्हा परिषद ते विधानभवन : एका महत्त्वकांक्षेचा “दैदीप्यमान प्रवास” – रोखठोक न्युज
आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीयविशेष वृतान्त

सावळज जिल्हा परिषद ते विधानभवन : एका महत्त्वकांक्षेचा “दैदीप्यमान प्रवास”

कहाणी सावळज जिल्हा परिषद गटाची =(भाग 4)

Amazon.in/ONLINE SHOPPING

तासगाव, मिलिंद पोळ -9890710999

१९७८ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत सावळज गटातून बैलाच्या चिन्हावर उभा राहिलेला आर.आर. पाटील नावाचा तरुण जिंकला, तेव्हा केवळ एक निवडणूक जिंकली नव्हती. त्या विजयाने तासगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर एक नवं वादळ उभं राहिलं होतं. लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला होता शब्दांनी जिंकणारा नेता कसा असतो, आणि वक्तृत्व हीसुद्धा सत्ता कशी बनू शकते.

आर.आर. पाटील यांचं भाषण म्हणजे थेट श्रोत्यांच्या काळजात घुसणारी धार होती. अभ्यास, उदाहरणं, टोचणारे प्रश्न आणि सामान्य माणसाच्या भाषेतली मांडणी या सगळ्याचा मिलाफ त्यांच्या वक्तृत्वात होता. हीच ताकद त्यांनी शस्त्र म्हणून वापरली. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी केवळ सावळज गटापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलं नाही. ते अख्खा तासगाव तालुका पिंजून काढू लागले. जिल्हा परिषद कार्यालय असो वा गावातली एखादी सामान्य तक्रार लोक अडीअडचणी घेऊन थेट आर.आर. पाटलांकडे येऊ लागले.

सांगली जिल्हा परिषदेत त्यांनी अक्षरशः ठाण मांडलं. पदाधिकारी असोत किंवा प्रशासकीय अधिकारी आर.आर. पाटलांचा अभ्यास, प्रश्नांची तयारी आणि मुद्देसूद मांडणी यामुळे अनेकांना घाम फुटू लागला. हळूहळू ते केवळ जिल्हा परिषद सदस्य राहिले नाहीत, तर जिल्हाभर चर्चेचा विषय बनले. आणि अशाच वेळी त्यांच्या मनात एक सुप्त इच्छा डोकावू लागली…विधानसभा.

दरम्यान, तासगाव विधानसभा मतदारसंघात १९७८ साली काँग्रेसकडून दिनकर आबा पाटील यांनी जनता पक्षाचे उमेदवार वासुदेव जाधव यांचा तब्बल ३०,७०७ मतांनी पराभव केला होता. ही दिनकर आबांची पहिलीच विधानसभा निवडणूक होती आणि तासगावच्या राजकारणात ते निर्विवाद नेता म्हणून उभे राहिले होते.

पण देशाचं राजकारण पुन्हा बदललं. इंदिरा गांधी यांनी राज्य सरकार बरखास्त केलं आणि १९८० मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. यावेळी काँग्रेसने धक्कादायक निर्णय घेतला.विद्यमान आमदार दिनकर आबा पाटील यांची उमेदवारी डावलून स्वातंत्र्यसैनिक भाई गणपतराव कोळी यांना तिकीट दिलं. दिनकर आबांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून ते मैदानात उतरले.

ही निवडणूक आर.आर. पाटील यांच्यासाठी कसोटी होती. वसंतदादा पाटील यांच्या सहवासातून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. दिल्लीतून आदेश आला होता काँग्रेस उमेदवार म्हणून भाई गणपतराव कोळी यांनाच पाठिंबा द्यायचा. आणि या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी वसंतदादांनी थेट आर.आर. पाटील यांच्या खांद्यावर टाकली.

स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेल्या भाई गणपतराव कोळी यांचा प्रचार आर.आर. पाटील यांनी अक्षरशः जिवावर बेतून केला. ही निवडणूक तासगाव तालुक्यातील सर्वांत अटीतटीची निवडणूक ठरली. काँग्रेस विरुद्ध काँग्रेसचाच बंडखोर राजकीय वातावरण तापलं होतं. निकाल लागला तेव्हा धक्का बसला. दिनकर आबा पाटील अवघ्या १,५२८ मतांनी विजयी झाले. त्यांना २५,२०६ मते, तर भाई गणपतराव कोळी यांना २३,६७८ मते मिळाली होती.

१९७८ मध्ये तीस हजारांहून अधिक मताधिक्य मिळवणाऱ्या दिनकर आबांचं मताधिक्य अवघ्या दीड हजारावर आलं होतं. हीच ती फट होती जी आर.आर. पाटील यांनी अचूक ओळखली.

१९८५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. पण यावेळी उमेदवारी मिळाली नाही. दिनकर आबा पाटील मात्र तिसऱ्यांदा आमदार झाले तेही तब्बल ३६,८३७ मताधिक्याने. याच काळात दिनकर आबांना हळूहळू जाणवू लागलं होतं की आर.आर. पाटील केवळ जिल्हा परिषदेपुरते थांबणार नाहीत. त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी होती.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आर.आर. पाटील यांनी तालुकाभर आपला स्वतंत्र गट उभा केला. जनसंपर्क, कामांची पद्धत आणि भाषणांच्या जोरावर त्यांनी स्वतःची राजकीय जमीन तयार केली. जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सलग अकरा वर्षे त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हीच संधी त्यांनी पूर्ण ताकदीने वापरली.

१९८९ मध्ये अखेर काँग्रेसकडून आर.आर. पाटील यांना विधानसभा तिकीट मिळालं. त्यांच्या विरोधात तासगावचे नगराध्यक्ष डी.एम. पाटील अपक्ष म्हणून उभे राहिले. ही निवडणूकही तितकीच चुरशीची झाली. पण यावेळी निकाल स्पष्ट होता. आर.आर. पाटील ३२,५५५ मताधिक्याने विजयी झाले. आणि तासगाव तालुक्यात “आर.आर. पाटील पर्वा”ची अधिकृत सुरुवात झाली.

पुढे ते राज्याचे ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झाले. त्यांचा राजकीय आलेख सातत्याने वर चढत गेला. पण सावळज जिल्हा परिषद गटावर त्यांची नजर कायम होती.

१९८९ नंतर १९९२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या. आता प्रश्न उभा राहिला.सावळज गटातून उमेदवार कोण? गेली अकरा वर्षे आर.आर. पाटील स्वतः त्या गटाचे प्रतिनिधित्व करत होते. आता ते आमदार झाले होते. तालुकाभर सत्ता प्रस्थापित करायची असेल, तर सावळज गट आपल्या माणसाकडेच हवा हे त्यांना माहीत होतं.

गावातील ज्येष्ठ नेते रावसाहेब पोळ, रावसाहेब पाटील यांनी उमेदवार सुचवला. पण इथेच आर.आर. पाटील यांनी मोठं राजकीय चातुर्य दाखवलं. प्रस्थापित मोठ्या घरातील उमेदवार डावलून त्यांनी नवख्या, सर्वसामान्य घरातील उमेदवाराला मैदानात उतरवलं. हा निर्णय अनेकांना मान्य झाला नाही.

याच निर्णयामुळे, त्यांच्या राजकीय वाटचालीत सिंहाचा वाटा उचलणारे रावसाहेब पोळच त्यांच्या विरोधात उभे राहिले.इथून पुढे सावळजच्या राजकारणात मैत्री, संघर्ष, निष्ठा आणि सत्तेचे नवे समीकरण आकाराला येणार होते…

याची पुढची, अधिक धारदार कथा पुढील भागात…(क्रमश:)

वरील लेख मालिकेतील माहिती आपल्यास आवडल्यास कृपया नक्की प्रतिक्रिया द्या. व काही माहिती बाबत शंका असल्यास संपर्क करा. 🙏🏻

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!