आमदार रोहित पाटील यांच्या प्रयत्नांना यश; सिद्धेवाडी प्रकल्पास २४.६२ कोटींची प्रशासकीय मान्यता
सावळज, वायफळे, बिरणवाडी, सिद्धेवाडी व अंजनी गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तासगाव, रोखठोक न्यूज
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सिद्धेवाडी मध्यम प्रकल्पाच्या सांडवा दुरुस्ती व कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी शासनाने २४.६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
हा निर्णय आमदार रोहित आर.आर. पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा परिणाम असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ४ नोव्हेंबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांच्या उपस्थितीतच शासकीय मान्यतेचे पत्र जलसंपदा विभागाकडून देण्यात आले.

१९७२ साली सुरू झालेल्या सिद्धेवाडी प्रकल्पाच्या गळतीमुळे शेवटच्या टप्प्यांपर्यंत पाणी पोहोचत नव्हते. मंजूर निधीतून सांडवा दुरुस्ती, कालवे अस्तरीकरण व संरक्षक भिंतींचे बांधकाम होणार असून या कामांमुळे १५०० हेक्टरहून अधिक शेती ओलिताखाली येणार आहे.

शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत करत “आमदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पाण्याच्या शाश्वतीचा नवा टप्पा सुरू झाला आहे,” अशी भावना व्यक्त केली. या निर्णयामुळे मतदारसंघात शेती उत्पादनवाढ आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.



