डोंगरसोनीत अंगणवाडीचे काम निकृष्ट
ग्रा. पं. सदस्य अमित झांबरे यांचा आरोप : वर्षभरातच अंगणवाडीची इमारत भेगाळली

तासगाव,रोखठोक न्यूज नेटवर्क
तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील अंगणवाडी क्र. 187 चे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही इमारत ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यागोदरच त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या बांधकामाची चौकशी व्हावी. निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांना दिले आहे.
डोंगरसोनी येथील कै. गोविंद दादा झांबरे यांच्या स्मरणार्थ श्रीमती तानुबाई गोविंद झांबरे यांनी अंगणवाडी क्र. 187 साठी दोन गुंठे जागा दान केली आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेतून या कामासाठी 11 लाख 20 हजार रुपये या कामासाठी अंदाजपत्रकीय रक्कम मंजूर करण्यात आली होती. अनिल बबन झांबरे यांनी या कामाची निविदा भरली होती. त्यांना हे काम मिळाले. या कामावर 10 लाख रुपये खर्च करण्यात आले.
15 फेब्रुवारी 2023 रोजी या अंगणवाडीच्या इमारतीचे काम सुरू झाले. तर 14 जुलै 2023 रोजी हे काम पूर्ण झाले. मात्र काम पूर्ण होऊन एक वर्ष होण्यागोदरच या इमारतीच्या भिंतींना भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही इमारत ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याअगोदरच भिंतींना भेगा पडल्याने ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे आक्रमक झाले आहेत.

झांबरे यांनी या निकृष्ट कामाबाबत गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी तक्रार दिली आहे. निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ठेकेदाराच्या गाडीत बसून ‘बांधकाम’च्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी..!
डोंगरसोनी येथील अंगणवाडी क्र 187 चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य अमित झांबरे यांनी केली आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क हे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या गाडीतून येऊन बांधकामाची पाहणी केली. जर शासकीय अधिकारी ठेकेदाराच्या गाडीत बसून निकृष्ट बांधकामाची पाहणी करत असतील तर ठेकेदारावर कारवाई करायची नैतिकता त्यांच्याकडे आहे का, असा सवाल झांबरे यांनी केला आहे.



