रायगडावरील “वाघ्या” कुत्र्याची दंतकथा

छत्रपती शिवरायांच्या दुःखद निधनानंतर रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादाबाहेरील पूर्वेकडील दरवाजासमोर त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी त्यांची समाधी आहे. तिच्या बाजूला तथाकथित ‘वाघ्या’ कुत्र्याचीसुद्धा समाधी आहे. असे म्हणतात की,शिवरायांचा एक लाडका कुत्रा होता. शिवरायांच्या निधनानंतर सारेच शोकाकुल झाले,तसाच तोही झाला. शिवरायांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यावर कुत्र्याने त्यावर झेप घेतली आणि त्यात तो सुद्धा जळाला.
या घटनेवर अनेक कवींनी काव्यरचना केली. ‘राजधानी रायगड’ या पुस्तकाचे लेखक विष्णू वासुदेव जोशी यांनी “श्री शिवाजी महाराजांबरोबर त्यांचा आवडता कुत्रा चितेत उडी घेऊन मेला या आख्यायिकेवर श्री.भालचंद्र कवी (महाड) यांनी केलेले काव्य त्यांच्या परवानगीने देत आहे ”,अशी माहिती देऊन परिशिष्टात (पृ.१४१) ही कविता दिलेली आहे. ‘अनुचर’या शीर्षकाखालील या कवितेत आठ कडवे आहेत. त्यापैकी तिसऱ्या कडव्यात “ विशालाकृती,मिसाळ ढवळा, श्वानकेसरी नर-केसरिचा I ऐसा जो जगताला गमला,साचा अनुचर छत्रपतींचा I” असे त्याचे वर्णन आलेले आहे. जणू काय प्रत्यक्ष कवीने त्याला पाहिले असावे असे हे वर्णन आहे. “जे न देखे रवी,ते देखे कवी” असे म्हणतात,ते उगीच नव्हे ! कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांनी आपल्या ‘राजसंन्यास’ या नाटकात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्याच्या आधारे रायगडावरील ‘वाघ्या कुत्र्याची समाधी’ उभारली गेली. तिची कथाही मोठी रंजक आणि उत्कंठावर्धक आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८६८ मध्ये ‘शिवाजी महाराजांचा पोवाडा’ रचला होता. तो अर्पण करण्याकरिता १८६९ मध्ये ते रायगडावर गेले होते. शिवजयंती साजरी करण्याची कल्पना त्यांच्या मनात होती. त्यादृष्टीने त्यांनी शिवरायांची समाधी शोधून तिच्या भोवताल असलेली घाणेरी व इतर झुडुपे बाजूला करून ती पाण्याने स्वच्छ केली आणि तिच्यावर फुले वाहिली. त्यावेळी त्यांनी या समाधीची झालेली दुरवस्था पाहून दुःख व्यक्त केले होते. शिवरायांचे कार्य घरोघरी पोहोचावे यासाठी त्यांनी १८७०मध्ये पुण्यात शिवजयंती साजरी केली.
त्यानंतर जेम्स डग्लस १८८३साली रायगडावर येऊन शिवरायांच्या समाधीची अवस्था पाहून ढसाढसा रडला होता,असे म्हणतात. त्याने समाधीची मापे घेऊन नकाशे तयार केले होते. १८८५ला मुंबई इलाख्याचे तेव्हाचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी गडावर येऊन समाधीची रेखाचित्रे काढली होती.
१९२६ मध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने समाधीच्या चबुतऱ्यावर अष्टकोनी मेघडंबरी बांधली. या चबुतऱ्याची डागडुजी करण्याच्या दृष्टीने पाया खणताना त्यांना मानवी अस्थींचे तुकडे व राख आणि एका प्राण्याची न जळालेली हाडे व कवटी सापडली. त्यापैकी अर्धवट जळालेली हाडे कशाची आहेत,हे जाणून घेण्याच्या हेतूने स्मारक समितीचे अध्यक्ष श्री.न. चिं.केळकर यांनी २५ डिसेंबर १९२५ रोजी कलकत्त्याच्या प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेकडे पाठविली. १२ जानेवारी १९२६ रोजी प्रस्तुत संस्थेने याविषयीचा अहवाल समितीकडे पाठविला. त्यानुसार ती हाडे ‘ऊदमांजराची’ आहेत हे स्पष्ट झाले. ३१ एप्रिल १९२६ रोजी रायगडावर समाधीच्या जीर्णोद्धाराचा समारंभ झाला. त्यावेळी समाधी अर्धवट स्थितीत होती व पुढे १९२७ मध्ये ती पूर्ण झाली.
समाधी पूर्ण करण्याकरिता पुरेसा पैसा उपलब्ध नसल्यामुळे स्मारक समितीचे पदाधिकारी देणगी मागण्याकरिता इंदूरचे राजे तुकोजी होळकरांकडे गेले. राणी शर्मिष्टादेवी यांचा अत्यंत प्राणप्रिय कुत्रा मेला आहे,त्यामुळे राजेसाहेब सुतकात आहेत म्हणून भेटू शकणार नाहीत,असे त्यांना सांगण्यात आले. पैशाची आवश्यकता असल्यामुळे आठवडाभर सारे सदस्य इंदूरमध्ये मुक्कामास राहिले. सुतक संपल्यावर राजेसाहेबांची भेट त्यांनी घेतली. राजेसाहेबांनी देणगी देण्याचे मान्य केले,पण त्यांच्या कुत्र्याचे स्मारक व्हावे अशी सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली. या माहितीत कितपत तथ्य आह्रे,हे निश्चितपणे सांगता येत नाही. लोकमाता अहिल्यामाई होळकरांचा सुतकांसारख्या रूढी-प्रथांवर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांच्या घराण्यातील लोक कुत्र्याचे सुतक पाळण्याएवढे मागासलेले असतील असे वाटत नाही.
स्मारक समितीच्या सदस्यांनी तुकोजी होळकरांकडून देणगी घेतली आणि शिवरायांच्या समाधीच्या उंचीएवढा स्तंभ उभारून त्यावर कुत्र्याची प्रतिमा १९३६ मध्ये बसविली. त्यामुळे शिल्पकार करमरकर यांनी सप्तधातूमध्ये बनविलेला हा कुत्र्याचा पुतळा ‘वाघ्या कुत्र्याचा’ आहे,असे पुढे प्रचलित झाले.
शिवसमाधीच्या पायाशी आढळलेली हाडे उदमांजराची आहेत,हे निष्पन्न झाल्यावरही स्मारक समितीने असे का केले असावे हा प्रश्न अभ्यासकांपुढे उभा आहे. त्याचे उत्तर असे दिले जाते,की या निमित्ताने शिवरायांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्याकरिता निधी उपलब्ध व्हावा. त्यांच्या उदात्त हेतूविषयी शंका घेण्यात काही अर्थ नाही.परंतु,त्यामुळे एका ‘असत्याला’ सत्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली,हे एक वास्तव आहे.
शिवरायांच्या समाधीविषयी सर्वप्रथम गोविंद बाबाजी जोशी वसईकर यांनी ‘ऱायगड किल्ल्याचे वर्णन’ हे पुस्तक इ.स.१८८७ मध्ये लिहिले. त्यात त्यांनी तथाकथित वाघ्याबद्दल काहीही लिहिले नाही. महाडचे गोविंद गोपाळ टिपणीस यांनी ‘ रायगडची माहिती ‘ हे पुस्तक १८९६ मध्ये लिहिले. त्यातही या तथाकथित वाघ्याचा उल्लेख नाही.. ‘रायगडची जीवनकथा’ सांगणाऱ्या शां.वि.आवळस्करांनीही याचा उल्लेख आपल्या शोधग्रंथात केला नाही. विष्णु वासुदेव जोशी यांनी या कथेला ‘आख्यायिका’ म्हणून संबोधले. ‘रायगड दर्शन’ या पुस्तकात प्र.न.देशपांडे यांनी (पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग,महाराष्ट्र शासन,मुंबई,१९८१.पृ.३३) ‘दंतकथा’ म्हणून तिची संभावना केली. रायगडाचे स्थापत्यशास्त्राच्या अंगाने संशोधन करणारे स्थापत्यविशारद गोपाल चांदोरकर यांनी ‘शोध शिवसमाधीचा’या पुस्तकात(प्रफुल्लता प्रकाशन,पुणे,२०००,पृ.२१) यावर आपले मत दिले आहे. ते म्हणतात-
“ निदान हा कुत्रा तरी महाराजांचा वाघ्या कुत्रा नाही हे निर्विवाद. एका संस्थानिकाची लहर,एका कवीची कल्पना आणि समितीची पैसे जमविण्याची हातोटी यांतून वाघ्याचा हा ऐतिहासिक वा तार्किक शक्यता नसलेला पुतळा उभारला गेला.” पुढे त्यांनी, “ वाघ्याची ही समाधी नाही हे मान्य केले म्हणजे मग एकच शक्यता उरते. ती समाधी आपल्या लाडक्या शिवप्रभूंची असू शकेल,” असे म्हटले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्र.के.घाणेकर यांनी १९९२मध्ये लिहिलेल्या ‘तो रायगड ‘ आणि २००९ मध्ये लिहिलेल्या ‘दुर्गदुर्गेश्वर रायगड ‘ ह्या ग्रंथात अनेक पुराव्यानिशी वाघ्या कुत्र्याच्या दंतकथेचा समाचार घेतला आहे.
ashokrana.2811@gmail.com 9325514277
Ashok Rana sir @Facebook



