गावोगावी गजबजल्या ग्रामसभा; तासगावात सेवा पंधरवड्याला उत्साही सुरुवात
योगेवाडीतील ग्रामसभेला तहसीलदारांची उपस्थिती

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यात दि. १७ सप्टेंबर पासून (बुधवार ) “सेवा पंधरवडा” सुरू झाला असून गावोगाव ग्रामसभांचा गजबजलेला माहोल पाहायला मिळाला. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार महसूल विभागासह इतर विभागांनी आपापले उपक्रम लोकांसमोर मांडले.
या निमित्ताने योगेवाडी (ता. तासगाव ) येथील ग्रामसभेला तहसीलदार अतुल पाटोळे स्वतः उपस्थित होते. ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले, “शासनाने दिलेली प्रत्येक सेवा ही लोकांच्या दारात पोहोचावी हा सेवा पंधरवड्याचा मुख्य हेतू आहे. महसूल विभागाच्या पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेमुळे आता शेतकरी बंधूंचे वाद कायमचे संपतील. रस्ते हे फक्त रस्ते नसून गावाच्या भविष्यातील विकासाचे धागे आहेत.”
काल शिवार फेरी काढून गावातील नकाशावर असलेले व नकाशावर नसलेले पण वापरात असलेले असे दोन प्रकारचे पाणंद रस्ते शोधून त्यांची स्वतंत्र याद्या तयार करण्यात आल्या होत्या. आजच्या ग्रामसभेत या याद्या मांडून ग्रामस्थांची मान्यता घेण्यात आली. आता सीमांकन करून अतिक्रमण दूर करण्यात येणार असून, रस्ते मोकळे झाल्यावर त्यांच्या दुतर्फा झाडे लावून ती कायमची सुरक्षित करण्याची तयारी आहे.
तहसीलदार पाटोळे यांनी पुढे सांगितले की, “मोकळे झालेले रस्ते सातबाऱ्यावर व इतर कागदपत्रांवर नोंदवले जातील. त्यामुळे भविष्यात शेतरस्त्यांबाबतचे वाद कायमचे थांबतील. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून प्रशासन व गावकरी हातात हात घालून काम करतील, तेव्हाच खरी प्रगती होईल.”
आजच्या विशेष ग्रामसभांना गावातील महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी उपस्थित होते. गावकरीसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले. सेवा पंधरवड्याचा हा पहिला दिवस पाहता, पुढील काही दिवसांत प्रशासन आणि जनता मिळून गावविकासाची नवी पायरी गाठणार हे स्पष्ट झालं आहे.



