सावर्डे गावात भूजल संवर्धनाचा मोठा उपक्रम – उत्तम दिघे यांच्या हस्ते जलतारा खड्ड्यांचे उद्घाटन

तासगाव, रोखठोक न्यूज
सावर्डे (ता. तासगाव) येथे सेवा पंधरवडा अंतर्गत रोजगार हमी योजनेतर्फे गावातील भूजल पातळी सुधारण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलतारा खड्ड्यांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री उत्तम दिघे यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमाद्वारे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाईल, ज्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने बागायत पिकांना मोठा लाभ मिळणार आहे.
सावर्डे गावात सुमारे 200 पेक्षा जास्त जलतारा खड्डे करण्याचे प्रस्ताव आलेले असून, आतापर्यंत जवळपास 40 खड्डे पूर्ण झाले आहेत. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत शोषले जाईल आणि भूजल पातळी सुधारण्यात मदत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्यात अतुल पाटोळे, तहसीलदार तासगाव, प्रशांत बुचडे, मंडळ अधिकारी, ऋतुजा पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी ग्रामपंचायत सावर्डे येथे भेट देऊन येथील विविध सेवा उपक्रमांचा आढावा घेतला. यासोबतच आरोग्य विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” उपक्रमाची पाहणी केली, ज्यामध्ये गावातील महिलांची डायबिटीस, उच्च रक्तदाब व इतर तपासण्या घरोघरी केल्या जात आहेत.
दिघे यांनी ग्राम महसूल कार्यालयास भेट देऊन सेवा पंधरवडा अंतर्गत चालू असलेल्या कामकाजाचे अवलोकन केले आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे सावर्डे गावात भूजल संवर्धन तसेच आरोग्य क्षेत्रात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



