एस.टी. सुविधांसाठी आ. रोहित पाटील यांचा मुंबईत पाठपुरावा

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील प्रवासी व नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार रोहित पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांबाबत मुंबई येथे महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. या संदर्भात त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. कुसेकर यांची विशेष भेट घेऊन चर्चा केली.
या भेटीत आमदार पाटील यांनी मतदारसंघातील एस.टी. आगार व बसस्थानकांवरील प्रलंबित आणि प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. यामध्ये बसस्थानकांची देखभाल, प्रवाशांसाठी मूलभूत सोयी-सुविधा, नव्या बसेसची गरज तसेच कर्मचाऱ्यांच्या अडचणी या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली.
प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी आवश्यक असणारी सर्व पायाभूत सुविधा लवकरात लवकर उभारली जावीत, या दृष्टीने आमदार पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांकडे ठोस भूमिका मांडली. सर्व अडचणींची सविस्तर माहिती देऊन प्रस्तावांना गती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
या प्रसंगी आमदार पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागातील प्रवाशांचे जीवन एस.टी. वर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सुविधा वाढविणे अत्यावश्यक आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन कामांना गती मिळाल्यास मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
या चर्चेनंतर महामंडळानेही सकारात्मक दृष्टीकोन दाखवत प्रस्तावांचा लवकरात लवकर विचार करून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.



