# म्हैसाळ योजनेचे तीन पंप सुरू ;अलमट्टीशी विसर्गाबद्दल समन्वय – रोखठोक न्युज
आपला जिल्हाकृषीताज्या घडामोडी

म्हैसाळ योजनेचे तीन पंप सुरू ;अलमट्टीशी विसर्गाबद्दल समन्वय

जलसंपदाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांची माहिती

Amazon.in/ONLINE SHOPPING

सांगली: प्रतिनिधी

सांगलीतील पूर परिस्थिती आणि जत तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने म्हैसाळ पाणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी तीन पंप सुरू करण्यात आले. टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरू केले जातील अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली. पूरस्थिती बाबत अलमट्टीशी कर्नाटकने सायंकाळी विसर्ग सव्वा दोन लाखावर नेल्याची माहितीही त्यांनी दिली.
श्री. पाटोळे यांनी सांगितले की, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार आवर्तन सुरू करण्यात येत आहे. जत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत जिथे पाणी जाणे शक्य आहे तिथे पर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व पंप सुरू केले जातील. बिळूर आणि देवनाळ कालवा तसेच उमदीपर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे.
अलमट्टी प्रशासनाशी समन्वय
कोयना धरणातून अद्याप फार मोठा विसर्ग सुरू झालेला नाही. सध्याच्या स्थितीत दररोज साधारण चार टीएमसी पाणी कोयना धरणात वाढत आहे. त्याचा विचार करता शनिवार किंवा रविवारी कोयनेचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊन त्याबाबतचे नियोजन होईल. मात्र त्यापूर्वीच अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याबाबत वेळोवेळी कर्नाटकशी पत्रव्यवहार सुरू आहे. अलमट्टी व्यवस्थापनाशी सांगली पाटबंधारे विभागाचा संपर्क असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सांगली पाटबंधारेने केलेल्या आवाहनानुसार त्यांनी विसर्ग वाढवण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळी हा विसर्ग सव्वा दोन लाख क्यूसेक्स इतका केला आहे. आवश्यकतेनुसार कर्नाटक विसर्ग वाढवेल अशी आशा आहे. त्या दृष्टीने आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी समन्वयाने चर्चा करत असल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.
बुधवारी सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ पाण्याची पातळी तीस फूट होती. गुरुवारी सकाळपर्यंत त्यात आणखी एक ते दीड फूट पाण्याची भर पडेल असेही ते म्हणाले. नागरिकांना पूरस्थितीची माहिती देण्यासाठी अधिकृत नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती जाणून घ्यावी असे आवाहनही पाटोळे यांनी केले आहे.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!