रोहित फाळकेच्या मृतदेहावर 42 तासांनी अंत्यसंस्कार
वायफळेत तणावपूर्ण शांतता : पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी

तासगाव, रोखठोक न्यूज
तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याचा गुरुवारी सायंकाळी धारधार शस्त्राने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके याच्यासह टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रोहितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. अखेर ‘एलसीबी’ने संशयित विशाल फाळके याला पुणे येथे बेड्या ठोकल्या. त्यानंतर सुमारे 42 तासांनी रोहितच्या मृतदेहावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्या वायफळे येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके यांच्या कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत. याच वादातून अनेक वेळा मारामाऱ्या झाल्या आहेत. यातून दोन्ही कुटुंबांमधील अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, जुन्या वादाचा राग मनात धरून विशाल फाळके याने आपल्या टोळीसह गुरुवारी सायंकाळी वायफळे येथील बसस्थानक चौकात नंग्या तलवारी नाचवत दहशत केली. त्याठिकाणी चौकात थांबलेल्या रोहित फाळके, त्याच्या मामाची मुले आदित्य साठे, आशिष साठे (रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर तलवार व कोयत्याच्या सहाय्याने हल्ला चढवला. तर त्याठिकाणी बसलेल्या सिकंदर शिकलगार यांच्यावरही टोळक्याने हल्ला केला.
विशाल फाळके याच्यासह टोळीकडून हल्ला होत असताना रोहित फाळके हा आपल्या घराकडे पळून गेला. तर आदित्य साठे, आशिष साठे व सिकंदर शिकलगार हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यानंतर विशाल फाळके व त्याच्या टोळीने रोहितचा पाठलाग केला. त्याच्या घरासमोरही त्याच्यावर सपासप वार केले. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी वडील संजय व आई जयश्री हे धावून आले. त्यांच्यावरही या टोळक्याने हल्ला केला. यानंतर टोळक्याने पलायन केले.
जखमी अवस्थेत सहाही जणांना भिवघाट येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोहित फाळके यांचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. त्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका रोहितच्या नातेवाईकांनी घेतली होती.

दरम्यान, पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे गतिमान केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम आरोपीच्या मागावर होती. अखेर पुणे येथून सराईत गुन्हेगार विशाल फाळके याला बेड्या ठोकण्यात ‘एलसीबी’ला यश आले. खुनानंतर अवघ्या 24 तासात आरोपीला जेरबंद करण्याची कामगिरी पोलिसांनी केली. इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर आज रोहित याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील संजय फाळके यांनी हे अंत्यसंस्कार केले. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खुनाच्या घटनेनंतर वायफळे येथील सामान्य नागरिक हादरले आहेत. सध्या वायफळे येथे तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.



