सावळजच्या सचिन पाटील यांची युवक कार्याध्यक्षपदी निवड
तालुक्यातील राजकीय समीकरणांचा नवा पट

तासगाव , रोखठोक न्यूज
तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेली युवक पदाधिकाऱ्यांची निवड केवळ संघटनात्मक वाटत असली, तरी त्यामागे आगामी राजकीय समीकरणांचा ठसा उमटताना दिसतो. सावळजसारख्या संवेदनशील व राजकीयदृष्ट्या जटिल गावातून पैलवान सचिन उर्फ चिंटू पाटील यांची तालुका युवक कार्याध्यक्षपदी नियुक्ती ही त्याचीच साक्ष आहे.
आमदार रोहित पाटील यांच्याकडून युवकांना प्राधान्य देण्याची ही कृती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे स्पष्ट होते. अलीकडील पदाधिकारी निवडीमुळे “आगामी रणांगणात तरुणाईला संधी मिळणार” असा संदेश पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे.
सावळज गाव राजकीय दृष्टीने नेहमीच चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या गावातील उमद्या चेहऱ्यावर विश्वास दाखवून संघटनात्मक पातळीवर आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. स्थानिक पातळीवर ही निवड म्हणजे रोहित पाटील यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिलेला सन्मान आणि गावागावांत नव्या उमेदवारांना संधी देण्याचा राजकीय संदेश आहे. नवीन कार्याध्यक्ष सचिन पाटील यांना तालुक्यातील नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा समेट घडवून तालुक्यात संघटना बळकट करण्याचे मोठे आव्हान आहे.
नूतन कार्याध्यक्ष सचिन पाटील हे स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या कट्टर समर्थक असलेल्या स्व. शिदगौडा पाटील यांचे सुपुत्र. त्यामुळे पक्षातील जुन्या पिढीच्या निष्ठावंत परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीचा उर्जा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो. हाच संगम पक्षासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत अद्याप बाकी आहे. त्या सोडतीनंतर सावळजसारख्या महत्त्वाच्या गावातून सचिन पाटील यांना आणखी मोठी संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीचा उपयोग पक्षाने आगामी रणनितीमध्ये कसा करून घेतला जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सावळज व परिसरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांत सचिन पाटील यांचा नेहमी पुढाकार असतो. कॉलेजपासून ते कुस्तीच्या मैदानापर्यंत त्यांनी लोकप्रियता मिळवली आहे. आज त्यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी फटाक्यांची आतषबाजी, होर्डिंग्ज, अभिनंदनाचा जल्लोष पाहायला मिळाला. हे दृश्य त्यांच्या जनाधाराचे प्रतिबिंब मानले जात आहे.
सचिन पाटील यांची निवड ही केवळ पदाधिकारी बदल नसून, तासगाव तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणांना आकार देणारी घटना आहे. पक्षांतर्गत नव्या पिढीला संधी देत असताना जुन्या निष्ठावंतांचा वारसाही जपण्याचा प्रयत्न यातून दिसतो. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्थानिक पातळीवर आगामी निवडणुकांची रणनिती सुरू केली असल्याचे स्पष्ट होते.



