दि सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटीची भरारी : सभासदांना १२ टक्के लाभांश, लोकाभिमुख कार्याचा ठसा
वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

तासगाव,रोखठोक न्यूज
सावळज (ता. तासगाव) येथील दि सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीत पार पडली. सभासदांना तब्बल १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेने लोकाभिमुख कार्याची परंपरा जपत सातत्याने प्रगती साधली असून, सभासदांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवले आहे.
सावळज परिसर द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागात शेतकरी व द्राक्ष उत्पादक हेच प्रमुख अर्थचक्राचे केंद्रबिंदू आहेत. शेतकऱ्यांपासून ते छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांना तात्काळ पतपुरवठा करून सावळज सोसायटीने या भागाच्या अर्थकारणाला मोठा आधार दिला आहे.
अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या आयुष्याची बचत अनमोल ठेव या सोसायटीत ठेवून विश्वास दाखवला आहे. तो विश्वास संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे जपत आहेत. त्यामुळे सावळज सोसायटी ही केवळ आर्थिक संस्था न राहता गावोगाव विश्वासाचे प्रतीक ठरली आहे.
समाजकारणातून अर्थकारणाकडे वाटचाल
सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी ही केवळ बँकिंग संस्था नसून, एक समाजकारण व अर्थकारण यांचा संगम आहे. समाजकारण व राजकारण करताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत त्यांची अर्थकारणाची घडी व्यवस्थित बसावी या उदात्त हेतूने चेअरमन विवेक सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संस्था उभी केली. आज ही सोसायटी सभासदांच्या हिताचा ठाम पाया रचत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी सांगितले, “सभासदांच्या हितासाठी सोसायटीने सातत्याने लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. भविष्यातही ही दिशा कायम ठेवून संस्थेने सर्वसामान्यांना बळ देणारे कार्य अधिक प्रभावीपणे करावे.
चेअरमन विवेक सावंत यांनीही, कर्मचाऱ्यांच्या नम्र सेवेसह संचालक मंडळ, सल्लागार व मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे संस्थेने ठोस कामगिरी साधली असल्याचे सांगितले. “सभासदांचा विश्वास हेच आमचे बळ आहे. त्यांचे हित जोपासणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे संस्थेची प्रगतीची गती आणखी वेगवान होईल.”
सातत्याने प्रगतीचा प्रवास
सलग तीन वर्षे ‘अ’ वर्गात राहण्याचा मान सावळज सोसायटीने मिळवला आहे. अल्पावधीतच तब्बल ७ कोटी रुपयांची उलाढाल गाठत जिल्ह्यात ठसा उमटवला आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पदाधिकाऱ्यांचे सभासदांकडून कौतुक झाले.
वार्षिक अहवाल संभाजी चव्हाण यांनी सादर केला, आभार अजित पवार यांनी मानले, तर सूत्रसंचालन आप्पासाहेब सुतार यांनी केले.
या वेळी चेअरमन विवेक सावंत, व्हा. चेअरमन ओमन पाटील, संचालक शिवाजी जाधव, सिध्दनाथ जाधव, विश्वास निकम, विनायक पाटील, सुरेश निकम, महेश थोरात, माजी उपसरपंच संजय थोरात,आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, दामू पवार, महावीर धेंडे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

सभासदांना आकर्षक लाभांश, शेतकरी-व्यावसायिकांना तत्काळ पतपुरवठा, पारदर्शक व विश्वासार्ह कारभार आणि समाजकारणातून उभी राहिलेली आर्थिक शक्ती यामुळे सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटीची प्रगतीशील ओळख आणखी बळकट होत आहे.



