तासगावात अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई! चार किलो गांजा जप्त
डोंगरसोनीतील एकाला अटक, नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या जाळ्यात

तासगाव,रोखठोक न्यूज
तासगाव-आरवडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या चतुराईपूर्ण कारवाईत गांजाची मोठी खेप पकडण्यात आली आहे. हॉटेलच्या बाजूला संशयास्पदपणे उभ्या असलेल्या मोटारीसह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चार किलोपेक्षा अधिक गांजा आणि आठ लाख रुपयांची मोटार असा तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई केल्याने तासगावातील अमली पदार्थांच्या साखळीला मोठा धक्का बसला आहे. पोलिस शिपाई विठ्ठल श्रीकांत सानप (वय ३३) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, अटक केलेल्या संशयिताचे नाव सचिन आप्पासाहेब निकम (वय ३०, रा. निकम वस्ती, डोंगरसोनी, ता. तासगाव) असे आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती मोटारीतून गांजाची विक्री करण्यासाठी आरवडे रस्त्याच्या दिशेने येत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचला. तपासादरम्यान एका हॉटेलजवळ उभी असलेली मोटार पाहून पोलिसांनी झडती घेतली असता, सचिन निकम हा त्यातच आढळला. त्याच्या मोटारीतून चार किलो तीनशे पाच ग्रॅम गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे ₹१,०८,५०० इतकी आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून ₹८ लाख किंमतीची मोटार (क्र. MH 10 DB 5206) आणि गांजा असा एकूण ₹९ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तासगाव पोलिसांनी संशयिताची सखोल चौकशी सुरू केली असून, गांजा कोठून आणला आणि कोणाला विक्रीसाठी घेऊन जात होता याचा तपास गतीमान झाला आहे. या कारवाईचे नेतृत्व उपनिरीक्षक अविनाश घोरपडे यांनी केले.
तासगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ माजली असून, पोलिसांनी परिसरात गुन्हेगारीवर घट्ट पकड मिळवली आहे.



