सावळजचा सामाजिक गौरव : संस्कृती, किल्ले आणि यशाचा संगम
दि सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी व विवेक (राजू) सावंत युथ सर्कलतर्फे किल्ला स्पर्धा; अनिरुद्ध चव्हाणचा सन्मान

तासगाव: प्रतिनिधी
सावळज (ता. तासगाव) येथे परंपरा, संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर संगम साकारत सावळज गावाने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली. विवेक (राजू) सावंत युथ सर्कल आणि दि सावळज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “भव्य किल्ला स्पर्धा २०२५”चा बक्षीस वितरण समारंभ उत्साह, एकजुटी आणि संस्कृतीप्रेमाच्या वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात सिद्धेवाडीचे सुपुत्र अनिरुद्ध विलासराव चव्हाण यांनी एमपीएससी २०२४ मध्ये राज्यात ३६वा क्रमांक मिळवत संपूर्ण परिसराचा मान उंचावला. त्यांच्या या यशाचा सन्मान दि सावळज को-ऑप क्रेडिट सोसायटी तर्फे संस्थेचे संस्थापक चेअरमन विवेक (राजू) सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यावेळी बोलताना सावंत म्हणाले,सावळजच्या तरुणांनी संस्कृती आणि शिक्षणाचा उत्तम संगम घडवून दाखवला आहे. अनिरुद्धच्या यशातून प्रेरणा घेऊन अधिक युवकांनी समाजात प्रगतीची नवी पायरी चढावी, हाच या उपक्रमाचा हेतू आहे.
किल्ला स्पर्धेत गावातील युवकांनी मराठा परंपरेचा वारसा जोपासत ऐतिहासिक किल्ल्यांची कलात्मक आणि नक्षीदार बांधणी सादर केली. प्रत्येक किल्ल्यात इतिहासाचे दर्शन आणि तरुणाईची कल्पकता दिसून आली. कार्यक्रमाने सावळजच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी दिली.

या कार्यक्रमाला, सल्लागार समिती अध्यक्ष बबन पाटील, सचिव संभाजी चव्हाण, संचालक शिवाजीराव जाधव, विश्वास निकम, सिद्धनाथ जाधव, काशिनाथ भडके, महावीर धेंडे, संभाजी पाटील, संदीप कांबळे, संजय भोरे, सुनील सुतार, पिंटू सुतार,प्रमोद घारगे,मधुकर गायकवाड,अविनाश हंकारे, अविनाश म्हेत्रे,मारुती बुधवले यांच्यासह युथ सर्कलचे सदस्य, हितचिंतक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
सावळजने या उपक्रमातून दाखवून दिले की, संस्कृतीचा अभिमान आणि तरुणाईचा उत्साह जपणारे समाजच खऱ्या अर्थाने प्रगत होतात.या सोहळ्याने सावळजच्या सामाजिक जाणिवेला नवी दिशा आणि प्रेरणा दिली.



