राज्यात प्लॅस्टिक फुलावर बंदी आणा : आ. रोहित पाटीलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
१०५ आमदारांचे सही सह पाठिंबा पत्र ; शासनाकडून तातडीने बैठक लावण्याचे आश्वासन

तासगाव, रोखठोक न्यूज
कृत्रिम फुले बंद व्हावीत व फुल उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये बैठक लावून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तासगाव कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी निवेदनाद्वारे केली. या मागणीला १०५ आमदारांचे सही सह पाठिंबा पत्र जोडत फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे हे लक्षात आणून दिले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे.
आ. रोहित पाटील यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यात सर्रासपणे प्लॅस्टिक फुलांचा वापर प्रचंड प्रमाणात झाला आहे. त्यामुळे शेतीतील विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून सदरची फुले बाजारात प्लॅस्टिकच्या फुलांमुळे अत्यल्प दरात विक्री होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्लॅस्टिक पिशवी वापरावर ज्याप्रमाणे शासनाने बंदी आणली त्याप्रमाणे या प्लॅस्टिकच्या फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध घातल्यास त्याचा शेतकरी वर्गास मोठा फायदा होणार आहे. द्राक्षपिक व इतर फळपिकांना पर्यायी व्यापारी पिक म्हणून फुलशेती केली जाते. या फुलशेतीसाठी लागणारी औषधे, मजुरी व ट्रान्सपोर्ट खर्च पाहता शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे प्लॅस्टिक फुलांवर कायमस्वरूपी निर्बंध आणून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणेसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान आ. पाटील यांनी प्लॅस्टिक फुलावर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीला विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल १०५ आमदारांनी स्वाक्षरी देऊन पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पण त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर प्लास्टिक फुलांमुळे गंभीर परिणाम होत आहे. ही महत्त्वाची बाब आमदार रोहित पाटील यांनी लक्षामध्ये आणून दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या विषयावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वस्त केले आहे.



