तासगाव नगरपरिषद निवडणूक : रोहित पाटील प्रकृतीमुळे अनुपस्थित; सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वात दमदार प्रचार शुभारंभ

तासगाव :रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीला सुरुवात होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांनी आज भव्य पदयात्रेने प्रचाराचा झंझावात उठवला. मात्र प्रचार शुभारंभावेळी आमदार रोहित पाटील प्रकृती बिघडल्याने अनुपस्थित राहिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी असा सल्ला दिल्याने ते आजच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत. तरीही ते उद्यापासून (सोमवार)पुन्हा प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती मिळाली.
आमदार अनुपस्थित असूनही संपूर्ण नेतृत्वाची धुरा माजी आमदार सुमनताई आर.आर. पाटील यांनी समर्थपणे सांभाळली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वासंती बाळासाहेब सावंत तसेच पॅनलमधील सर्व २४ उमेदवारांसह तासगाव बाजार समितीपासून सुरू झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख देवस्थानांतून मार्गक्रमण करत गणपती मंदिरात सामोपचाराने संपन्न झाली.हजारो महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
शुभारंभावेळी सुमनताई पाटील म्हणाल्या, “तासगावची सुज्ञ जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे. तुतारी चिन्हावरील प्रत्येक उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळत आहे.” त्यांच्या उत्साहवर्धक संदेशामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य संचारल्याचे जाणवले.

दरम्यान, रोहित पाटील यांची अनुपस्थिती तात्पुरतीच असून सोमवार पासून ते प्रचारात पुन्हा सक्रिय होतील, अशी माहिती पक्ष पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचार मोहीमेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आजच्या शक्तिप्रदर्शनानंतर तासगावमधील निवडणूक वातावरण आणखी रंगतदार झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) एकजुटीचा प्रत्यय या कार्यक्रमातून प्रभावीपणे आला. सुमनताईंचे नेतृत्व आणि उद्यापासून रोहित पाटील मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेमुळे पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रचार शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाची माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, तासगाव शहर अध्यक्ष ॲड. गजानन खूजट, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.



