दहिवडी येथे चोरट्याची घरात घुसून महिलेला मारहाण : सहा तोळ्याचे दागिने लुटले
दिवसा ढवळ्या घडली घटना ; नागरीकाच्यात भीतीचे वातावरण

तासगाव,रोखठोक न्यूज नेटवर्क
दहिवडी ( ता, तासगाव ) येथे दिवसा ढवळ्या महिलेच्या घरात घुसून महिलेला मारहाण करून सहा तोळे लुटून नेले. चोरट्याच्या मारहाणीत अश्विनी संदीप जाधव ( वय ३५ )या जखमी झाल्या आहेत. याबाबत सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी : सोमवारी सकाळी साडे आकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू होता.त्यामुळे गावातील रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती. त्याच वेळी अश्विनी या घरी एकट्याच होत्या .ही संधी साधून अज्ञात तिघा जणांनी घरात प्रवेश केला.त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून कपाटाची चावी कुठे आहे अशी मागणी अश्विनी याच्या कडे केली.अचानक झालेल्या या घटनेने अश्विनी या गर्भगळीत झाल्या.याच्या फायदा घरवून चोरट्यानी त्याच्या कानातील व गळ्यातील दागिने काढून घेतले. शिवाय कपाटातील दागिने घेऊन चोरट्यानी पोबारा केला. चोरटे जाताच अश्विनी यांनी मोबाईल वरून या घटनेची माहिती पती संदीप याना दिली.
काही वेळातच शेजारील लोक घटना स्थळी आले पण तो पर्यत चोरटे पसार झाले.तरुणांनी चोरट्याच्या शोध घेण्याचा प्रयत्न केला पण चोरटे हाताला लागले नाहीत.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे व गुन्हे प्रकटीकरण पथक घटना स्थळी दाखल होऊन त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेने अश्विनी याना मानसिक धक्का बसला होता.बराच काळ त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या त्यांच्यावर सावळज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री अश्विनी जाधव पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत सावळज मध्ये थांबून संबंधित घटनेचा तपास करत होते. दहिवडी येथे दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



