संदीप गिड्ढे ‘सायलेंट मोड’मध्ये; निर्णायक भूमिकेवर राजकीय वर्तुळात कयासांचे सावट
नाराजी कोणाच्या पथ्यावर? तासगावात गिड्ढेंना मानणारा प्रभावी गट; शांतता राजकारणाला दिशा देणार?

तासगाव : रोखठोक न्यूज
तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली असली तरी भाजप किसान मोर्चाचे प्रमुख संदीप गिड्ढे मात्र या साऱ्या गोंगाटापासून दूर—अगदी ‘सायलेंट मोड’मध्ये आहेत. शहरातील गल्लोगल्ली उमेदवारांची लगबग, शोभायात्रा, कार्यकर्त्यांची गर्दी… पण या सगळ्यात गिड्ढेंचा मागमूसही नाही. त्यांच्या नाराजीच्या चर्चेला आता राजकीय रंग चढला असून, “ही शांतता अखेर कोणाच्या पथ्यावर पडणार?” हा सगळ्यांचा मोठा प्रश्न बनला आहे.
माजी खासदार संजय पाटील यांनी भाजपपासून दुरावा घेतल्यानंतर तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघात पक्ष अक्षरशः मोडकळीस आला. अशा वेळी संदीप गिड्ढे पुढे आले आणि ‘वादळात दिवा’ पेटवण्याचा प्रयत्न केला. ७५ हजार सदस्य नोंदणी, लाखो रुपयांची मोहीम, ग्रामपातळीवरील पदाधिकाऱ्यांची निवड, गावागावात संघटन उभारणी… गिड्ढेंच्या पुढाकाराने भाजपला नवसंजीवनी मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
बैलगाडा शर्यत, दहीहंडी, तरुणांच्या कार्यक्रमांद्वारे त्यांनी मतदारसंघात चांगली ‘हवा’ तयार केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामांची वाटही खुली केली. यानंतर तासगावात भाजपचे जनसंपर्क कार्यालय उघडून निवडणूक मोर्चा जोरात बांधला. उमेदवारांची निवड, फॉर्म भरणे, माघारी प्रक्रिया—गिड्ढेंचा ‘अॅक्टिव्ह मोड’ तेव्हापर्यंत दिसत होता.
नंतर मात्र अचानक शांतता.भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीसाठी केलेले प्रयत्न, खासदार संजय पाटील यांच्यासोबत झालेली बैठक… या सर्वानंतर गिड्ढे अचानक गायब झाले. पक्षाच्या प्रचारयंत्रणेतील त्यांच्या अनुपस्थितीने तासगाव राजकारणात प्रश्नांचे ढग दाटले आहेत.
ते नेमके नाराज का?
पक्षातील अंतर्गत समीकरणे?
युतीमधील असहकार?
की शहरातील नेतृत्वावरील असंतोष?
याबाबत तर्क–वितर्क वेगाने फिरत आहेत.
संदीप गिड्ढे हे तासगावचे जावई. वरचे गल्ली, ढवळवेस परिसरात त्यांचा मजबूत जनसंपर्क. अनेक गोविंदा पथके, सांस्कृतिक गट, तरुणांचा त्यांना मिळणारा पाठिंबा—यामुळे शहरात त्यांना मानणारा मोठा गट आहे. त्यामुळे ते कोणत्या बाजूने झुकतात किंवा निवडणूक संपूर्णपणे तटस्थ राहतात, यावर काही प्रभागांतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या तरी ते पूर्णपणे अलिप्त राहिल्याचे दिसते. परंतु त्यांच्या शांततेतूनच मोठा स्फोट होऊ शकतो, अशीच चर्चा तासगावच्या गल्लीबोळात रंगताना दिसते.निवडणुकीच्या काहीच दिवसांवर वळण आले असताना संदीप गिड्ढे कोणासोबत?
कोणाविरोधात?की पूर्णपणे तटस्थ?
या प्रश्नांची उत्तरं तासगावच्या राजकीय दिशेला निर्णायक वळण देणार आहेत.



