विशेष वृतान्त
सावळजमध्ये आज ‘द्राक्ष दिन’
महाशिवरात्र निमित्त आयोजन ; श्री सावळसिद्ध विकास सोसायटी चा पुढाकार

तासगांव : प्रतिनिधी
सावळज (ता. तासगांव) येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या पुढाकाराने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता सावळज गावाचे ग्रामदैवत श्री सावळसिद्ध मंदिरासमोर महाशिवरात्रीच्या निमित्ताने ‘द्राक्ष दिन’ साजरा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या गुणकारी द्राक्षांची जनजागृती व्हावी, यासाठी द्राक्ष दिन साजरा करण्याचे आयोजन केले असल्याची माहिती मा. चेअरमन ऋषिकेश बिरणे यांनी दिली आहे.
तासगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. तासगाव तालुक्यातील द्राक्षे परदेशात जाऊन परकीय चलन प्राप्त करत आहेत. देशांतर्गतही तासगाव तालुक्यातील द्राक्षाला मोठी मागणी असते. यावर्षी नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीतही द्राक्ष बागायतरांनी चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेतले आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. द्राक्ष फळाविषयी ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. द्राक्ष फळांमध्ये विविध गुणकारी औषधे गुणधर्म आहेत, याची जनजागृती होऊन द्राक्ष फळ विक्रीत वाढ होण्यासाठी महाशिवरात्री या पवित्र सणादिवशी द्राक्ष दिन साजरा करण्यात येणार आहे.
द्राक्ष सल्लागार यश ऍग्रो लॅबचे चेअरमन विजय कुंभार यांच्या प्रेरणेने हा द्राक्ष दिन साजरा करण्यात येणार आहे. सावळसिद्ध मंदिरासमोर सकाळी आठ वाजता द्राक्ष दिन साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक, द्राक्ष व्यापारी, द्राक्ष एजंट, द्राक्ष शेतकरी, द्राक्ष ग्राहक, विकास सोसायटी यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पदाधिकारी व पत्रकार, ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ऋषिकेश बिरणे यांनी केले आहे.



