संजयकाका भाजपमध्ये परतले तर राजकीय समीकरण बदलणार?
आचारसंहिता लागू होण्याआधी तासगावच्या राजकारणात सस्पेन्स, कार्यकर्त्यांत चर्चांना ऊत

तासगाव, मिलिंद पोळ
सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे. ऑक्टोबर महिन्यातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता व्यक्त होत असून, याआधीच गटबाजी, आघाड्या आणि घरवापसीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.
विशेष लक्ष वेधून घेत आहे ते माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हालचालींनी. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०२४) त्यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी घेतली होती. निकाल त्यांच्या विरुद्ध गेला असला तरी त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त संयमित भूमिका घेतली आहे. नेहमी आक्रमक शैलीत वावरणारे संजयकाका इतके शांत राहतील, हे त्यांच्या कार्यकर्त्यांनाही अनपेक्षित वाटत आहे.
मात्र, जाणकारांचे म्हणणे आहे की, संजयकाकांचा इतिहास बघता ते केवळ पराभवाने खचून बसतील असे नाही. जबरदस्त संघटन कौशल्य आणि जिल्हाभरातील संपर्कजाळे यामुळे ते लवकरच ठोस राजकीय निर्णय घेतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांत आहे. दरम्यान, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्वभावातही काहीसा बदल दिसून येत आहे. अनेक कार्यकर्ते संभ्रमात असले तरी, वरिष्ठ नेत्यांप्रमाणे संयम दाखवणे हेच त्यांच्यासाठी हिताचे ठरणार आहे. कारण, ज्येष्ठ जाणकारांच्या मते, राजकारणातील बेरीज-वजाबाकीचं गणित हे भावनांपेक्षा वेगळं असतं, आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा परिणाम थेट नेत्याच्या निर्णयावर होतो.
भाजपच्या दृष्टीने संजयकाका पाटील यांची घरवापसी मोठी गेमचेंजर ठरू शकते. भाजपचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर लावला असला, तरी संजयकाका भाजपमध्ये परतले तर समीकरणच बदलून जाईल. भाजपचे तालुकाध्यक्ष असणारे स्वप्निल पाटील पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय मान्य करून तालुक्यात भाजप अधिक भक्कमपणे उभी करतील. माजी खासदार संजय काका पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी ही स्थानिक पातळीवर धक्कादायक बाब ठरू शकते, तर आमदार रोहित पाटील यांच्यासाठी नवे आव्हान उभे राहू शकते.
आचारसंहिता लागू होण्याआधीच पक्षांतर्गत गळ घालणे, बंडखोरी रोखणे आणि आरक्षणाचा फायदा उचलणे यासाठी हालचालींना वेग आला आहे. गावपातळीवरील प्रचार मोहीमा, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांतून मतदारांशी संपर्क वाढवण्याची धडपड सुरू झाली आहे.
एकूणच, संजयकाका भाजपमध्ये परततात की राष्ट्रवादीतच टिकतात, यावर सांगली जिल्ह्याचे समीकरण ठरणार आहे. त्यांचा संयम जितका कार्यकर्त्यांसाठी प्रश्नचिन्ह आहे, तितकाच तो विरोधकांच्या राजकीय गणितात अस्वस्थता निर्माण करणारा ठरत आहे.



