# .. तर तुझा संतोष देशमुख करू ; येळावीत मुरूम माफियांची धमकी – रोखठोक न्युज
विशेष वृतान्त

.. तर तुझा संतोष देशमुख करू ; येळावीत मुरूम माफियांची धमकी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Amazon.in/ONLINE SHOPPING


तासगाव,प्रतिनिधी

तासगाव शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मुरूम उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाला कोलून लावत मुरूम माफियांनी हैदोस घातला आहे. बेदरकारपणे सुरू असणाऱ्या गौण – खनिज उत्खननाला विरोध करणाऱ्यांना ‘तुझा संतोष देशमुख करण्यास कमी करणार नाही’, अशा धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी येळावी येथील मुरूम तस्करांविरोधात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे अनंत पोळ व उमेश पाटील यांनी तक्रार केली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण देशभर गाजत असताना तासगाव तालुक्यातील मुरूम माफियांनी तक्रार करणाऱ्या सामान्य लोकांना धमकावण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यात गेल्या काही वर्षात अनेक मुरूम माफिया तयार झाले आहेत. सोबतच वाळू आणि मातीचेही उत्खनन सुरू आहे. मुरुमाच्या उपशाबरोबरच येरळा नदीचेही वस्त्रहरण सुरू आहे. परिणामी येरळा काठची शेती धोक्यात आली आहे.

अनेक ठिकाणी मुरूम, वाळू, मातीच्या उत्खननाला विरोध होतो. मात्र अल्पावधीत श्रीमंत होण्याचा राजमार्ग सापडलेले हैवान कोणालाही मेचत नाहीत. प्रत्येकजण स्वतःला वाल्मिक कराड समजत आहे. त्यांना मदत करणारे पांढरपेशे धेंडे, आकाही तयार झाले आहेत. त्यामुळेच मुरूम, वाळूसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीचे बिनधास्तपणे लचके तोडले जात आहेत.

कमी कष्टात पैसे मिळू लागल्याने अनेकजण चांगलेच माजले आहेत. अवैध उत्खननाला विरोध करणाऱ्यांना धमकावले जात आहे. तालुक्यातील येळावी भागात तर मुरूम माफियांनी हैदोस घातला आहे. मुरुमाच्या उत्खननाला व धोकादायक वाहतुकीला विरोध केल्यानंतर संबंधितांना धमक्या दिल्या जात आहेत.

येळावी येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अनंत जालिंदर पोळ व जिल्हा उपाध्यक्ष उमेश भुजंगराव पाटील यांनी मुरूम उत्खननाला विरोध केला होता. हे उत्खनन महसूल बुडवून होत असल्याचा आरोप केला होता. मात्र मंडळ अधिकाऱ्यांसह महसूलच्या यंत्रणेने याबाबत दखल घेतली नाही. मात्र मुरूम माफीयांनी पोळ व पाटील यांना धमक्या दिल्या.

‘आमच्या पाठीमागे फार मोठी राजकीय ताकद आहे. मोठ्या राजकीय हस्तीची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. अन्यथा तुमचा संतोष देशमुख करण्यासही कमी करणार नाही’, अशी धमकी अनंत पोळ यांना दिली आहे. याबाबत पोळ व पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. सामान्य लोकांना धमकवणाऱ्या मुरूम माफियांविरोधात लेखी तक्रार केली आहे. निवेदनावर अनंत पोळ, उमेश पाटील, मनोज माने यांची नावे आहेत.

मुरूम, वाळू माफियांची गुंडगिरी मोडीत काढा : जिल्हाधिकारी

येळावी येथील अनंत पोळ व भुजंगराव पाटील यांच्या लेखी तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी तातडीने तासगावचे तहसीलदार अतुल पाटोळे यांना फोन केला. तासगाव तालुक्यातील मुरूम, वाळूच्या तस्करीबाबत तक्रारी येत आहेत. हे माफिया सामान्य लोकांना धमकवत आहेत. त्यांच्यावर गुंडगिरी करत आहेत. त्यांची ही गुंडगिरी मोडीत काढा, अशा सूचना काकडे यांनी तहसीलदार पाटोळे यांना तातडीने दिल्या.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

शेअर करा.

संपादक- मिलिंद पोळ

बिनचूक व वेगवान बातमी, निर्भिड आणि नेमकं विश्लेषण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!