आपल्या घराप्रमाणे शहरही स्वच्छ ठेवा : कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचे आवाहन
तासगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य स्वच्छता मोहीम

तासगाव,प्रतिनिधी
आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसेच आपले शहर स्वच्छ ठेवणेही आपली जबाबदारी आहे. तासगावकरांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही; त्यामुळे अस्वच्छतेवर मात करून विजय मिळवूया, असे प्रतिपादन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले.
तासगाव नगरपरिषदेतर्फे, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम, शहर सौंदर्यीकरण आणि जुन्या बंद पडलेल्या संरचना दुरुस्त करणे असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
कृषी आयुक्त मांढरे म्हणाले की, स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो, तसेच आपला परिसर आणि पर्यायाने आपले शहर स्वच्छ राहील, याची जबाबदारी आपली आहे. तासगावकरांची स्वच्छतेबाबतची वृत्ती स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, तासगावकरांनी स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र सातत्य राखणे आवश्यक आहे. तासगाव नगरपरिषद स्वच्छता मोहिम स्पर्धेत चांगले काम करत आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या शहरासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी सामाजिक संस्था, असोसिएशन्स आणि नागरिकांचे स्वच्छता मोहिमेत सहभागाबद्दल अभिनंदन करण्यात आले.शहरातील यापूर्वी सौंदर्यीकरण झालेल्या तीन ठिकाणांची निवड करून, मुख्याधिकारी सुधाकर लेंढवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद पथकाने स्वच्छता मोहीम राबवली. नागरिकांनीही सक्रीय सहभाग घेतला.

कार्यक्रमाला विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी, प्रभारी जिल्हा सह आयुक्त शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, तहसीलदार अतुल पाटोळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सारथी संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळालेल्या चार मुलींना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच, स्वच्छता आणि सामाजिक कार्यावर सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करणारे रीलस्टार रोहन धनवडे व प्रेरणादायी व्हिडीओ बनविणारे सागर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, जिल्हाधिकारी काकडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या २४ तासांत तब्बल ५३ जणांनी अवयवदान करण्याची नोंद केली. ‘अवयवदान हेच श्रेष्ठदान’ या मोहिमेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
स्वच्छता मोहिमेत रोटरी क्लब ऑफ तासगाव, रोटरॅक्ट क्लब ऑफ ग्रेप सिटी तासगाव, तासगाव तालुका इंजिनियर्स असोसिएशन, ड्रगीस्ट व केमिस्ट असोसिएशन, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशन, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यासह इतर सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला.
स्वागत मुख्याधिकारी सुधाकर लेंढवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आण्णासाहेब बागल यांनी केले.



