शेतीला हक्काच पाणी आणि युवकांच्या हाताला रोजगार : रोहित पाटील
आबांच्या कर्मभूमीतुन मला आशीर्वाद मिळतील ; सावळज मधील पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तासगांव, रोखठोक न्यूज
स्वर्गीय आर. आर.आबा यांची जन्मभूमी जरी अंजनी असेल तरी कर्मभूमी सावळज आहे. याच गावाने आबांना जिल्हा परिषद सदस्य पदापासून राज्याच्या उपमुख्यमंत्री व दीर्घकालीन गृहमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम या गावाने परिसराने केले आहे. आबांचे नेतृत्व घडवणारी पिढी या विधानसभा निवडणुकीत मला आशीर्वाद देतील असा विश्वास तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना रोहित पाटील म्हणाले की, तासगाव तालुक्यावरचा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी आबांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. सावळसह परिसरातील गावांचा टेंभू योजनेमध्ये अधिकृत समावेश व्हावा यासाठी गतवर्षी सांगलीमध्ये जे आमरण उपोषण केले गेले त्यासाठी ही सावळज व परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. याचेच फलित म्हणून टेंभू सिंचन योजनेची सुप्रमा मंजूर झाली. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी जवळपास दीड टीएमसी पाणी सरकारकडून मंजूर करून घेण्यात आले आहे. संबंधित कामाची टेंडर प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येता काळात या भागाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

तालुक्यातील सुशिक्षित युवकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी योगेवाडीला एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. शेतीला हक्काच पाणी आणि युवकांच्या हाताला रोजगार हे स्वर्गीय आबांचे स्वप्न येत्या काळात पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे. या निवडणुकीत मला काम करण्याची संधी मिळावी मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवण्याचा शब्द तुम्हाला देतो असे आवाहन रोहित पाटील यांनी केले.
दरम्यान, सावळज येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू झालेल्या रोहित पाटील यांची पदयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. या प्रचार पदयात्रेसाठी युवकांसोबतच मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग होता. गावातील प्रमुख रस्त्यावरून जाणाऱ्या पदयात्रेला रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. रोहित पाटील यांनी गावातील ज्येष्ठांचे व माता-भगिनींचे आशीर्वाद पदयात्रेदरम्यान घेतले.
यावेळी सावळज गावच्या सरपंच मीनल पाटील, उपसरपंच रमेश कांबळे, मा.जि.प. सदस्य सागर पाटील, माजी सभापती मनीषा माळी, राजू सावंत, अॅड. विजय धेंडे, माजी सरपंच अरुण पाटील,महादेव चिवटे, संजय थोरात, बाळासो पाटील, सिद्धगोंडा पाटील, प्रकाश पाटील, सिद्धनाथ जाधव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश म्हेत्रे, भोला कांबळे, शोभा सुतार, अनिता भडके, कल्पना बुधवले, सुनिता पाटील, सचिन पाटील, नदीम तांबोळी, सौरभ कोळी यांच्यासह बहुसंख्येने समर्थक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा रोहित पाटलांना पाठिंबा

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर पाठिंबाचे पत्र सावळज येथील पदयात्रेदरम्यान देण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख अनिल शिंदे, तालुका उपप्रमुख संदीप मस्के, दयानंद कांबळे, सुनील मगदूम यांच्यासह बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



