अपूर्ण पॅनेल नावांचा गोंधळ; तासगावात आरोप-प्रत्यारोपांचा भडका!
शरद पवार गटाचे शहराध्यक्ष संतप्त; माजी खासदार संजय पाटील यांच्या पॅनेलवर थेट आरोप!

तासगाव :रोखठोक न्यूज
तासगाव नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तासगाव शहराध्यक्ष ॲड. गजानन खुजट यांनी काही आघाड्यांवर जाणूनबुजून अपूर्ण आणि दिशाभूल करणारी पॅनेल नावे वापरत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही पद्धत मतदारांची सरळसरळ फसवणूक आणि निवडणूक प्रक्रियेचा भयानक अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ॲड. खुजट यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार अपूर्ण पॅनेल नावांचा वापर हा आदर्श आचारसंहितेचा आणि प्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम २९ चा उघड उघड भंग आहे.
त्यांनी थेट नाव न घेता माजी खासदार संजय पाटील यांच्या पॅनेलकडे बोट दाखवत “हे भ्रष्ट आचरण असून निवडणूक प्रक्रियेवर गदा आणणारा गंभीर प्रकार आहे,” असा जळजळीत आरोप केला.
मतदारांना चुकीच्या दिशेने नेण्यासाठी जाणूनबुजून अपूर्ण नावांची पद्धत अवलंबली जात आहे. शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण करण्याचा हा खेळ चालू आहे. हे तात्काळ थांबवले नाही तर निवडणूक प्रक्रियेचा गाभाच हादरेल, असे ॲड. खुजट यांनी संतप्त शब्दात म्हटले.
त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दोन मोठ्या मागण्या केल्या..
1️⃣ अपूर्ण किंवा दिशाभूल करणारे नाव असलेले सर्व पोस्टर्स, बॅनर्स व सोशल मीडिया पोस्ट तात्काळ जप्त व हटवाव्यात.
2️⃣ प्रत्येक आघाडीला आपले अधिकृत, संपूर्ण व स्पष्ट नाव एकसमान फॉन्टमध्ये लिहिणे बंधनकारक करावे; उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
“मतदारांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अन्यथा चुकीच्या नावांच्या सावलीत निवडणुकीचे पारदर्शक वातावरण प्रदूषित होईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. गजानन खुजट यांनी प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला आहे.ही तक्रार समोर आल्याने तासगावच्या राजकारणात चांगलाच खळबळजनक वादंग सुरू झाला आहे.



